करोना व्हायरस: गोकुळधाम प्रसुतीगृह इमारतीचा वापर ‘गेस्ट हाऊस’साठी – gokuldham maternity building is using as guest house

0
77
Spread the love

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

महापालिकेने खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेतल्या आहेत. मात्र, आपल्या मालकीच्या गोरेगाव पूर्व येथील गोकुळधाम प्रसुतीगृहाची इमारत एका खासगी वैद्यकीय संस्थेकडून गेस्ट हाऊस म्हणून वापरली जात आहे. गोरेगाव, मालाड परिसरातील करोना रुग्णांच्या उपचारासाठी या इमारतीचा वापर करणे शक्य झाले असते. मात्र पालिका प्रशासनाकडून त्याकडे लक्ष दिले नसल्याची तक्रार होत आहे.

गोरेगाव परिसरात प्रसुतीगृहासाठी आरक्षण असलेल्या भूखंडावर उभारलेली ही चार मजली इमारत विकासकाकडून सन २०१३मध्ये महापालिकेच्या ताब्यात आली. पालिकेने ही इमारत एका खासगी वैद्यकीय संस्थेला प्रसुतीगृह चालविण्यासाठी दिली आहे. या संस्थेचे तिथूनच काही अंतरावर रुग्णालय आहे. रुग्णालयातील डॉक्टर, पारिचारिकांसाठी राहण्याचे ठिकाण म्हणून या इमारतीचा वापर करण्यात येतो आहे, अशी तक्रार येथील नगरसेविका प्रीती सातम यांनी पालिकेकडे केली आहे.

करोनाच्या संकटात पालिकेची सर्व रुग्णालये रुग्णांनी भरली आहेत. खासगी रुग्णालये पालिकेने ताब्यात घेतली आहेत. रुग्णांना खाट उपलब्ध होत नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयात महागडे उपचार घ्यावे लागत आहेत. मात्र, गोकुळधाममधली पालिकेच्या मालकीच्या प्रसुतीगृह इमारतीचा गेस्ट हाऊस म्हणून वापर केला जात आहे. स्थानिक करोना रुग्णांसाठी तिचा वापर पालिकेला करता आला असता, असे सातम यांनी सांगितले.

कारवाईची मागणी

पालिका आयुक्त ही इमारत पुन्हा ताब्यात घेणार आहेत की नाही, नागरिकांसाठी हे रुग्णालय सुरू होणार की नाही, असा सवाल सातम यांनी केला आहे. खासगी संस्थेने केलेल्या गैरवापराबद्दल त्यांच्यावर काय कारवाई करणार याची माहिती देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत पालिकेच्या पी-दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास क्षीरसागर यांच्याशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)