मुंबई उच्च न्यायालय: ‘त्या’ मृतदेहाची पुन्हा शवचिकित्सा करा: उच्च न्यायालय – dead body in hospital from a month, hc orders second autopsyc

0
20
Spread the love

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

‘काही तरुणांच्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू होऊनही पोलिस आरोपींना मदत करत आहेत आणि शवविच्छेदन अहवालाद्वारे पुराव्यांत फेरफार केला असल्याची शक्यता आहे’, असा आरोप करत एका तरुणाने सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिल्याने आणि मृतदेह तब्बल एक महिन्यापासून रुग्णालयाच्या शवागारात असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने अखेर त्या मृतदेहाची ५ जुलैपर्यंत दुसऱ्यांदा शवचिकित्सा करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. तसेच ‘शवचिकित्सा होताच मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात अंत्यविधीसाठी द्यावा आणि त्यांनी स्वीकारला नाही तर पोलिसांनी कायद्यानुसार अंत्यविधींसंबंधी कार्यवाही करावी’, असेही न्या. अमजद सय्यद व न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले.

चेंबूरमधील राजेश गवाले यांचे वडील बाळू गवाले यांचा मृतदेह एक महिन्यापासून राजावाडी रुग्णालयाच्या शवागारात आहे. ‘१ जूनच्या रात्री घराजवळच्या भरणी मैदानात क्षुल्लक कारणावरून भांडण झाल्यानंतर नीतेश राणे व त्याच्या मित्रांनी मला जबर मारहाण करून डोक्यात दगड मारल्याने मी रक्तबंबाळ झालो. तेव्हा बचावासाठी आलेल्या माझ्या वडिलांनादेखील त्यांनी मारहाण केली. नंतर ते बेशुद्ध पडले. त्यांना शताब्दी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याविषयीच्या तक्रारीनंतर चेंबूर पोलिसांनी आरोपींविरोधात आवश्यक कलमे लावलेली नाहीत. शवविच्छेदन अहवालातही नैसर्गिक मृत्यू दाखवल्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता आहे’, असे म्हणणे राजेश यांनी अॅड. प्रशांत पांडे यांच्यामार्फत मांडले.

तर ‘बाळू गवाले यांचा घटनेनंतर बऱ्याच वेळाने मृत्यू झाला आणि त्यांना मारहाण झाली नसल्याचे अनेक साक्षीदारांनी जबाबात सांगितले’, असे म्हणणे पोलिसांतर्फे सरकारी वकील जे. पी. याज्ञिक यांनी मांडले. त्यानंतर ‘दोन्ही बाजू ऐकल्यानंतर अर्जदार राजेश यांच्या म्हणण्याशी प्रथमदर्शनी आम्ही सहमत नाही. मात्र, त्यांचे वडील दगावले आहेत. त्यामुळे सहानुभूती म्हणून आणि शवविच्छेदन अहवालात छेडछाड झाल्याची त्यांच्या मनातील भीती दूर व्हावी, या दृष्टीने आम्ही दुसऱ्यांदा शवचिकित्सेचे निर्देश देत आहोत.

राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी दोन डॉक्टरांमार्फत (त्यात पहिल्यांदा शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरचा समावेश नसावा) ५ जुलैपर्यंत मृतदेहाची दुसऱ्यांदा शवचिकित्सा करून घ्यावी. त्यानंतर अहवालाची प्रतीक्षा न करता पोलिसांनी मृतदेह तात्काळ कुटुंबीयांच्या ताब्यात द्यावा. कुटुंबीयांनी ४८ तासांत मृतदेह ताब्यात घेतला नाही तर पोलिसांनी कायद्याप्रमाणे अंत्यविधी करावेत’, असे खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)