मुंबई विद्यापीठ: योगेश सोमण यांचे ‘ते’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल – mumbai university : yogesh soman’s presence in department head meeting

0
23
Spread the love

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या ७ जुलै रोजी झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीमध्ये योगेश सोमण यांनी हजेरी लावली होती. या संदर्भातील फोटो आणि स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर पसरल्याने नाट्यशास्त्राच्या आजी-माजी विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांनी सोमण यांच्याविरोधात विद्यापीठ आवारात १३ जानेवारीला केलेल्या आंदोलनानंतर सोमण यांच्याकडील कार्यभार प्रा. डॉ. गणेश चंदनशिवेंवर सोपवला होता. या प्रकरणी सत्यशोधन समितीची चौकशी सुरू होती. मात्र या संदर्भातील समितीचा निर्णय जाहीर न झाल्याने सोमण यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. दरम्यान, सोमण हे दोन्ही समित्यांच्या चौकशीअंती निर्दोष आढळल्याने कामावर रुजू झाले आहेत, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनातर्फे देण्यात आली.

अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे विद्यार्थी प्रतिनिधी अपूर्व इंगळे यांनी बैठकीच्या दुसऱ्या दिवशी ८ जुलै रोजी या संदर्भात कुलगुरूंना ईमेल केला. यामध्ये सोमण यांच्यासंदर्भातील चौकशी समितीने घेतलेला निर्णय जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. सोमण यांनी संचालक म्हणून काम करताना मनमानी कारभार केला असा आरोप करत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवून विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी करण्यासाठी सत्यशोधन समितीही स्थापन केली होती. या चौकशी समितीकडून १६ मार्च रोजी चौकशी करण्यात आली. मात्र त्याविषयी कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही तसेच, विद्यापीठाचे कोणतेही अधिकृत निवेदन शिक्षक-विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले नाही, असे इंगळे यांनी म्हटले आहे. पुनर्नियुक्तीबाबत कोणतेही अधिकृत पत्रक नसताना सोमण हे विभागप्रमुखांच्या बैठकीला कसे उपस्थित राहिले, या संदर्भात विद्यापीठ प्रशासनाने पद्धतीने उत्तर देण्याची मागणी त्यांनी केली. आंदोलनाच्या वेळी केलेल्या मागण्या पूर्ण न झाल्यास विद्यापीठाच्या आवारात उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

अभिनेते आणि अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे माजी विद्यार्थी अक्षय शिंपी यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर करत करोना काळाचा फायदा घेत सोमणांची पुनर्नियुक्ती ही विभागाच्या विद्यार्थ्यांची फसवणूक असल्याचे मत व्यक्त केले. संचालक म्हणून सोमण यांच्या कारभारामुळे आणि चुकीच्या निर्णयांमुळे विभागाचे नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला. सोमण यांनी कार्यभार स्वीकारण्याबाबत पत्रक का काढले नाही अशी विचारणा प्राध्यापकांनीही केल्याचे समजते.

विद्यापीठाच्या सूचनेनुसार अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचा प्रभारी कार्यभार २१ मे रोजी सोमण यांच्याकडे सोपवल्याची माहिती मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे संचालक प्रा. चंदनशिवे यांनी दिली. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याने योगेश सोमण हे स्वतःच रजेवर गेले होते आणि दोन्ही चौकशी समित्यांच्या अहवालात ते निर्दोष आढळल्याने पुन्हा कामावर रुजू झाल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले. ते स्वतःच रजेवर गेल्याने परिपत्रक काढण्याचा प्रश्न येत नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. रजेवर गेल्याने त्यांचा कार्यभार तात्पुरत्या काळासाठी सोपवण्यात आला होता. तो त्यांनी आता परत स्वीकारला आहे असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)