हिवाळ्यातील पर्यटन: सहल आयोजकांची हिवाळ्यासाठी तयारी – trip organizers prepare for winter

0
19
Spread the love

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

करोना संकट व लॉकडाउनचा वेगवेगळ्या क्षेत्रांना फटका बसला. त्यातील पर्यटन हेदेखील महत्त्वाचे क्षेत्र होते. आता राज्य सरकारने निवासी हॉटेलमधील ३३ टक्के खोल्या उघडण्याची मंजुरी दिल्यानंतर या क्षेत्रात नवी उमेद निर्माण झाली आहे. सहल आयोजकांनी आगामी हिवाळ्यातील पर्यटन सहलींच्या नियोजनाची तयारी सुरू केली आहे.

लॉकडाउन काळात सर्व विमानसेवा बंद झाल्या, तशी पर्यटनस्थळेही बंद करण्यात आली. यामुळे पर्यटनाशी निगडित सर्वच क्षेत्रांना जबर फटका बसला. सर्वाधिक पर्यटनाचा उन्हाळ्याचा काळ वाया गेला. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये पावसाळी पर्यटनाची मागणी असते. तो काळदेखील पूर्णपणे गेला आहे. मात्र आता हिवाळी पर्यटनाला चांगली मागणी असेल, असा विश्वास आयोजक व्यक्त करीत आहेत.

याबाबत ज्येष्ठ पर्यटन अभ्यासक अभिजित पाटील म्हणाले, ‘येत्या सप्टेंबरनंतर पर्यटन क्षेत्र खुले होईल, असा विश्वास आहे. महाराष्ट्रात पर्यटन तयारी काही अंशी कमी आहे. पण उर्वरित राज्यांत यादृष्टीने चांगली तयारी दिसून येत आहे. सर्वाधिक मागणीचा गोवा हिवाळी पर्यटनासाठी सज्ज आहे. यामुळेच मुंबईतील सहल आयोजकांनीही उत्साहाने काम सुरू केले आहे. हिवाळ्यातील सहलींची तयारी प्राथमिक स्वरुपात सुरू झाली आहे. नव्या उमेदीने आयोजक पुनर्निर्माणासाठी तयारी करीत आहेत.’

देशांतर्गत पर्यटनापेक्षाही परदेशातील पर्यटनाला चांगली मागणी असेल, असे अभिजित पाटील यांचे म्हणणे आहे. देशांतर्गत करोनाविरोधी उपाययोजनांच्या तुलनेत परदेशातील पर्यटनस्थळी अधिक सोयीसुविधा सध्या दिसतायत. दुबई, मॉरिशसमध्ये जून महिन्यातच लॉकडाउन मागे घेतले आहे. यामुळे परदेशातील सहलींचे आयोजन अधिक असेल, असे चित्र आहे. अशा बहुतांश सहली मुंबईतूनच होतात. त्याचवेळी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलवरूनही सप्टेंबरपासून क्रुझ सेवा पूर्ण तयारी व सुरक्षेसह सुरू होत आहेत. एकप्रकारे आयोजक तयारीत आहेत. राज्य सरकारने तसे सहकार्य द्यावे, असे आवाहन पाटील यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना केले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)