A month-long stock of remedicivir in Mumbai municipal hospitals scj 81 | महापालिका रुग्णालयात रेमडीसीवीरचा महिनाभराचा साठा!

0
24
Spread the love

संदीप आचार्य
मुंबई : करोनाच्या गंभीर रुग्णांसाठी जीवनदायी मानले जाणारे रेमडीसीवर मिळत नाही म्हणून मोठी ओरड असताना मुंबई महापालिकेने याची दखल घेत पुरेसा साठा करून ठेवला आहे. महापालिकेच्या केईएम, शीव व नायर रुग्णालयासह १८ प्रमुख उपनगरीय रुग्णालयात एक महिना पुरेल एवढा रेमडीसीवीरचा साठा आजघडीला उपलब्ध आहे.

खासगी रुग्णालयात तसेच राज्यात अन्यत्र रेमडीसीवीरसाठी रुग्ण व रुग्णालयांकडून मोठी ओरड होत असताना पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी पालिका रुग्णालयांसाठी गेल्याच आठवड्यात रेमडीसीवीर, टॅमिझुलॅब व अन्य अत्यावश्यक औषधे व इंजेक्शनचा पुरेसा साठा घेऊन ठेवला आहे.

गेल्या आठवड्यात करोनावरील उपचारात महत्त्वाचे मानल्या जाणार्या रेमडीसीवीरच्या तुटवड्यावरून एक वादळ निर्माण झाले होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेमडीसीवीर मिळत नाही असा मुद्दा उपस्थित करत मंत्री जितेंद्र आव्हाड व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे प्रश्न उपस्थित केले होते. मुळात रेमडीसीवर वा अन्य प्रमुख औषधे ही गंभीर रुग्णांना लागतात व त्यासाठी पुरेशी रुग्णालयीन व्यवस्था असणे गरजेचे आहे. ठाणे जिल्ह्यात वेगाने करोना पसरत असताना जिल्ह्यातील सहा महापालिका व ग्रामीण रुग्णालयात पुरेसे बेड तसेच ऑक्सिजन बेडसह अन्य व्यवस्था निर्माण करण्यात पालकमंत्री अजूनही यशस्वी ठरलेले नाहीत. यामुळे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात येऊन बैठक घेतली तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व पालिका आयुक्त व संबंधितांची बैठक घेऊन जम्बो रुग्णोपचार व्यवस्था निर्माण करण्याचे आदेश दिले.

त्यापूर्वी चार पालिका आयुक्तांसह काही अधिकार्यांच्याही बदल्या करण्यात आल्या. ठाणे जिल्ह्यातील करोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना रेमडीसीवीर च्या नावाखाली आपल्या अपयशाच खापर आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे व जितेंद्र आव्हाड यांनी केल्याचे एका सनदी अधिकार्यांनी आपले नाव जाहीर न करण्याचा अटीवर सांगितले. मुळात आता तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच रेमडीसीवरच्या यशस्वीतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात असून रुग्णांना वेळेत रुग्णालयात दाखल करणे व ऑक्सीजन व्यवस्थेसह आवश्यक ती औषधे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्वांचा आढावा घेतानाच ठाण्यात तातडीने रुग्णसेवा वाढविण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर मुंबई महापालिकेत ज्या प्रकारे आयुक्त चहेल यांनी रेमडिसीवर, टॅमीझुलॅब आदी औषधांची पुरेशी खरेदी केली त्याच धर्तीवर राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांना तात्काळ रेमडीसीवीर, टॅमीझुलॅब व फेवीबवीर ही औषधे खरेदी करण्यास सांगितले.

आरोग्य विभागानेही या औषध व इंजेक्शन खरेदीसाठी २० कोटी रुपयांची तरतूद केली असून यातून चार हजार रेमडीसीवीर वायल, सात हजार टॅमीझुलॅब व २७७० पाच हजार फेवीबवीर औषधे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्न व औषध प्रशासन कायदा, एपिडेमिक अॅक्टनुसार या औषधांचा काळाबाजार होणार नाही व खाजगी रुग्णालयांना ही ही औषधे पुरेशा प्रमाणात योग्य दरात उपलब्ध होतील याची काळजी घेतली जाणार असल्याचे आयुक्त चहेल यांनी सांगितले. सर्वात महत्वाची बाब म्हणजे पालिकेची १८ प्रमुख रुग्णालये तसेच केईएम, शीव व नायर रुग्णालयात वापरल्या जाणार्या रेमडीसीवरच्या प्रत्येक वायलचा तसेच अन्य महागड्या औषधांचा हिशेब द्यावा लागणार आहे. रुग्णाचे नाव, पत्ता, आधारकार्ड तसेच रेमडीसीवीरच्या किती वायल कधी वापरल्या याची रोजच्या रोज सायंकाळी सात वाजेपर्यंत माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या सर्वांची अचानक तपासणी करून खातरजमा केली जाईल, असे आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 3:31 pm

Web Title: a month long stock of remedicivir in mumbai municipal hospitals scj 81


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)