ashok chavan article on his father shankarrao chavan personality zws 70 | देवमाणूस!

0
31
Spread the love

महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद आणि केंद्रीय स्तरावर गृह व संरक्षण या खात्यांचे मंत्रिपद खंबीरपणे सांभाळून राज्याच्या आणि देशाच्या वाटचालीत ऐतिहासिक म्हणून नोंद झालेल्या अनेक निर्णय, प्रसंगांत मोलाची भूमिका वठवणारे दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीची सांगता १४ जुलै रोजी होत आहे. त्यानिमित्ताने, त्यांचे सुपुत्र आणि राज्याचे विद्यमान सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचा लेख.. शिस्तप्रिय, वक्तशीर म्हणून ख्यात असलेल्या शंकररावांच्या व्यक्तिमत्त्व आणि कार्याचे स्मरण करणारा!

सर्वसाधारणपणे नामवंतांच्या मुलांबाबत अनेकांना हेवा वाटतो. अशा कुटुंबात जन्माला येणे म्हणजे सहजसुलभ आयुष्य आणि कारकीर्द लाभते, असा त्यांचा समज असतो. पण हे सरसकट खरे असतेच असे नाही. किमान माझ्याबाबत तर हा अनुभव खचितच नाही. उलटपक्षी अनेकदा हा वारसा नैतिक जबाबदारी व आव्हाने वाढवणारा असतो.

मी शंकरराव चव्हाण यांच्या घरी जन्माला आलो. पण ते राजकारणात होते म्हणून मी राजकारणात आलो, असे नाही. पण लहानपणापासून घरात अनुभवलेल्या वातावरणामुळे मला स्वत:ला समाजकारणात गोडी निर्माण झाली. माझा ओढा पाहून वडिलांनी मला राजकारणात येण्याची संमती दिली. त्यांना पाहून मी राजकारण शिकलो. त्यांच्याकडून शिकण्यासारखे अनेक चांगले गुण होते. ‘शंकरराव चव्हाणांचा मुलगा’ म्हणून मला त्यांच्या पदांचा किंवा यशाचा वारसा मिळावा, असे मला कधीही वाटले नाही; तर त्यांच्यातील असंख्य गुण आणि कर्तबगारीचा मोह मला अधिक राहिला आहे.

वडिलांना आम्ही घरी नाना म्हणायचो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची अनेक वैशिष्टय़े होती. मला भावलेला त्यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे, त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात अंतर नव्हते. त्यांच्या आचार-विचारांत फरक नव्हता. ते बाहेर जसे शिस्तप्रिय, वक्तशीर होते तसेच ते घरातही होते. ते सार्वजनिक जीवनात परखड होते, तसेच ते कुटुंबातही होते. अनेकदा नातेवाईक, सहकारी आणि वेळप्रसंगी वरिष्ठही दुखावले असतील, पण त्यांनी स्पष्टवक्तेपणा सोडला नाही. नियम म्हणजे नियम! त्यात त्यांनी कधी कोणाला वेगळी वागणूक दिली नाही. त्यामुळेच त्यांना आयुष्यभर खंबीर राहता आले आणि देश व सार्वजनिक हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेता आले.

राज्य आणि देशाच्या पातळीवर त्यांच्याकडून अनेक मोठी कामे झाली. महाराष्ट्रातील सिंचन आणि भारताची अखंडता व सार्वभौमत्व कायम ठेवण्यासाठी केंद्राच्या स्तरावर घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, हे माझ्या लेखी त्यांची सर्वात मोठी देण आहे. महाराष्ट्रातील ३१ मोठय़ा धरणांपैकी निम्म्याहून अधिक धरणांच्या- उदा. भीमा नदीवरील उजनी धरण, कोकणातले काळ धरण, जायकवाडी, पैनगंगा प्रकल्प, विष्णुपुरी आदींच्या- उभारणीत त्यांचे योगदान मोलाचे होते. शेतकरी, पिण्याचे पाणी आणि उद्योग यांचा विचार केंद्रस्थानी ठेवून ही धरणे उभारली गेली. पाण्याच्या संदर्भात भविष्यातील आव्हाने त्यांनी त्याचवेळी ओळखली होती. पाण्याच्या प्रश्नाबाबत त्यांनी शास्त्रशुद्ध अभ्यास केला. आज ‘महाराष्ट्राचे भगीरथ’ म्हणून त्यांना ओळखले जाते आणि ही उपमाच त्यांच्या कार्याची महती सांगण्यास पुरेशी आहे.

नाना स्वातंत्र्यसैनिक होते. देशप्रेम त्यांच्या रोमारोमांत होते. भारताचे गृह आणि संरक्षणमंत्री असताना घेतलेल्या अनेक खंबीर निर्णयांमधून त्यांच्या निस्सीम राष्ट्रभक्तीची प्रचीती येते. दहशतवादाने ग्रासलेल्या जम्मू-काश्मीर आणि पंजाबमधील विधानसभा निवडणुकीचे नियोजन असो, मिझोरममधील काही नेत्यांची स्वायत्ततेची मागणी फेटाळून लावणे असो, श्रीलंकेतील एलटीटीई या बंडखोर संघटनेवर घातलेली बंदी असो; देशाच्या इतिहासात नोंद झालेल्या अनेक घडामोडींमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. देशाच्या राजकारणात इतरही असे अनेक प्रसंग आहेत, ज्या वेळी नानांनी अतिशय खमकी भूमिका घेतली.

शेतकरी आणि श्रमिक हे त्यांच्या कार्याच्या केंद्रस्थानी होते. शेतकरी कुटुंबात जन्माला आल्याने शेतकऱ्यांच्या व्यथांची त्यांना चांगली जाणीव होती. कोरडवाहू शेतकऱ्यांची फरफट टाळण्यासाठी त्यांनी आठमाही पाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी राजकीय परिणामांची तमा न बाळगता जाहीर व स्पष्ट भूमिका घेतली. श्रमिकांप्रतिही त्यांनी कायम बांधिलकी जपली. नाना मुख्यमंत्री असताना मुंबईतील ५२ गिरणी मालकांनी गिरण्यांच्या जमिनी विकण्यासाठी परवानगी मागितली. पण त्या वेळी गिरणी विकून मोकळे होणाऱ्या मालकांऐवजी त्यांनी तिथे काम करणाऱ्या कामगारांच्या हिताला प्राधान्य दिले. जमीन विकण्यापूर्वी गिरणी मालकांनी हजारो कामगारांच्या रोजगाराचा, भवितव्याचा काय विचार केला आहे, हा एकच प्रश्न नानांनी ठामपणे लावून धरला. कोणाच्याही दबावासमोर ते झुकले नाहीत. तत्त्व-मूल्यांशी तडजोड केली नाही. त्यांचा निर्मोह आणि सचोटी आयुष्याच्या अखेपर्यंत ढळली नाही.

नानांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी उल्लेखनीय पैलू म्हणजे ते दूरदर्शी होते, व्यासंगी होते. त्यांचे व्यवस्थापन कौशल्यही विलक्षण होते. त्यांच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत कमालीची परिपूर्णता होती. प्रशासनावर त्यांचा वचक होता. ते सतत कार्यमग्न असायचे. नवे प्रकल्प, नव्या योजनांच्या अनुषंगाने अभियंते, तज्ज्ञ आणि तंत्रज्ञांचा त्यांच्याकडे सतत राबता असायचा. रोज वेगवेगळ्या घटकांतील लोकांना ते भेटायचे, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करायचे. त्यांचा लोकसंग्रह अफाट होता आणि माझ्या लेखी हीच त्यांची सर्वात मोठी ठेव आहे. त्यांचा मुलगा म्हणून त्यांची ही ठेव जपण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे.

त्यांचे वाचन, माहिती अफाट होती. विषयांची जाण होती. मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या चारही भाषांवर त्यांची चांगली पकड होती. त्यांना शेरोशायरी, तबला, शास्त्रीय संगीत आणि नाटकांचीही आवड होती. संगीत नाटकेही ते बघायचे. अध्यात्मावर त्यांचा विश्वास होता. ‘शिवलीलामृत’चे ते पारायण करायचे. अतिशय खडतर आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढून ते शिकले, मोठे झाले. पण वाईट काळ ते कधीही विसरले नाही. आयुष्यभर काटकसरी राहिले. अगदी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असतानाही ते किती साधे राहायचे, याबाबत घरातील सदस्यांपेक्षा अन्य कोणाचाही अनुभव अधिक असू शकत नाही.

ते परखड होते, वरून कठोर होते; पण त्यांच्यात एक प्रेमळ, संवेदनशील, कुटुंबवत्सल माणूसही दडला होता. अडल्यानडल्यांना ते नेहमीच मदत करायचे. दुष्काळी भागात पाणी आणल्याबद्दल आणि अडचणीच्या काळात केलेल्या मदतीमुळे अनेक जण त्यांना जणू देवच मानत. असा हा ‘देवमाणूस’ मला वडील व गुरू म्हणून लाभला, यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजतो!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 4:23 am

Web Title: ashok chavan article on his father shankarrao chavan personality zws 70Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)