Be careful when starting school! Consider Kovid Kawasaki says Dr Subhash Salunkhe scj 81 | शाळा सुरु करताना सावधान! कोवीड कावासाकीचा विचार करा- डॉ. सुभाष साळुंखे

0
25
Spread the love

संदीप आचार्य 
मुंबई: आगामी काळात करोना वाढणार हे निश्चित असताना आता मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. लहान मुलांचे लसीकरण व कोवीड कावासाकी आजार लक्षात घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी स्वतंत्र विचार करण्यासाठी ‘लहान मुलांसाठी कोवीड विभाग’ सरकारने सुरु केला पाहिजे, अशी सुस्पष्ट भूमिका राज्याच्या मुख्य सचिवांचे प्रमुख आरोग्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी मांडली आहे.

“गेले तीन महिने राज्याची संपूर्ण आरोग्य यंत्रणा सर्वशक्तीनीशी करोनाशी लढत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक व नागपूर येथे ही लढाई महापालिकांच्या माध्यमातून सुरु आहे तर अन्यत्र आरोग्य विभाग करोनाच्या लढाईचा भार वाहात आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात आज पुरेसे डॉक्टर व आरोग्य कर्मचारी नाहीत. आयएएस वा आयपीएस सारखे आरोग्य केडरही गेल्या सहा दशकात महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याने निर्माण केलेले नाही. अशावेळी नवजात बालकांचे व लहान मुलांचे लसीकरण वेळीच होणे हा आता करोनाच्या पार्श्वभूमीवर कळीचा मुद्दा बनला आहे व सरकारने तो अत्यंत गंभीरपणे घेतला पाहिजे”, असे डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले. राज्यात दरवर्षी सुमारे २० लाख बाळांचा जन्म होतो. यातील आठ लाख बालके आरोग्य विभागाच्या रुग्णालयात तर चार लाख बालके ही महापालिका- नगरपालिका आरोग्य व्यवस्थेत जन्मतात. उर्वरित आठ लाख बाळांचा जन्म हा खासगी रुग्णालयात होत असून करोनाच्या सावलीत जन्मणार्या या बालकांची सदृढ वाढ होण्यासाठी लसीकरण कार्यक्रम व सकस आहार योजना प्रभावीपणे राबविला पाहिजे व तसे आपण सरकारला सांगितले असल्याचे डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले.

“दुसरा गंभीर मुद्दा आहे तो भारतात दिसत असलेल्या कोवीड कावासाकी आजाराचा. प्रामुख्याने लहान मुलांमध्ये हा आजार दिसत असल्याने शाळा सुरु करण्याची कोणतीही घाई सरकारने करू नये”, असा इशाराही डॉ. साळुंखे यांनी दिला आहे. या आजारात लहान मुलांमध्ये करोना बरोबर कावासाकी आजारासदृष्य लक्षणे दिसत आहेत. या आजारात शरीरावर चट्टे उठणे, डोळे लाल होणे, जीभ व ओठ लाल होणे आदी बाह्य लक्षणे दिसतात तसेच शरीरांतर्गत अवयवांना सुज येते. प्रामुख्याने यात अॅन्टिबॉडीज जास्त प्रमाणात तयार होऊन रक्तवाहिन्यांना सुज येते, असे ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप केळकर यांनी सांगितले. न्युयॉर्क मध्ये अलीकडेच १४७ लहान मुलांना कोवीड कावासाकी आजार झाल्याचे आढळून आले आहे. अमेरिका व युरोपातील काही देशात करोनाची लागण झालेल्या व न झालेल्या अशा दोन्ही गटातील मुलांना हा आजार झाल्याचे दिसून येत असून भारतातही आता कोवीड कावासाकीचे रुग्ण आढळून आल्यामुळे शाळा सुरू करण्यापूर्वी सरकारने या दिशेने योग्य विचार केला पाहिजे, असे डॉ. संदीप केळकर यांनी सांगितले.

जपानमध्ये १९६१ साली प्रथम या आजाराचा शोध डॉ. कावासाकी यांना लागला होता व त्यांचेच नाव या आजाराला देण्यात आले आहे. महाराष्ट्रात ११ ते २० वयोगटातील नऊ हजार जणांना करोनाची लागण झाली आहे तर दहा वर्षाखालील पाच हजार मुलांना लागण झाल्याचे शासकीय आकडेवारी सांगते. ‘करोना कावासाकी’ आजारातही कावासाकी आजारातील काही लक्षणे दिसतात व शरीरांतर्गत अवयवांना सूज येते. “पहिल्या आठवड्यात वा दहा दिवसाच्या आत यावर उपचार झाल्यास रुग्ण निश्चित बरा होतो. आयव्ही इन्युनोग्लोबीन ( आयव्हीआयजी) दिल्यास रुग्ण नक्की बरा होतो मात्र हा खार्चिक उपाय असल्याचे”ही डॉ. केळकर यांचे म्हणणे आहे.

“कावासाकी सदृश्य आजाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असून लहान मुलांमधील हा आजार बरा होण्यास दीर्घकाळ लागू शकतो तसेच यात मुलांच्या मेंदू व मूत्रपिंडावर परिणाम होऊ शकतो , असे डॉ. साळुंखे म्हणाले. करोनाचा लहान मुलांमधील कमी प्रमाणात असला तरी होणारा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शाळा सुरु करताना विशेष काळजी घेतली जावी तसेच लहान मुलांचा करोना विभाग सुरु करावा”, अशी भूमिका डॉ. सुभाष साळुंखे यांनी मांडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 9:50 am

Web Title: be careful when starting school consider kovid kawasaki says dr subhash salunkhe scj 81


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)