Coronavirus in Kandivali Boivali Dahisar under control | Coronavirus  : कांदिवली, बोरिवली, दहिसर नियंत्रणात

0
23
Spread the love

२२ प्रतिबंधित क्षेत्रे, दोन हजार इमारती निर्बंधांतून मुक्त; २.२० लाख संशयितांचा शोध घेण्यात यश

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरातील करोनाबाधितांच्या संपर्कातील दोन लाख २० हजार व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून या भागातील रुग्ण दुप्पट होण्याचा काळ सरासरी २६.५३ दिवसांवर पोहोचला आहे. विविध उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या वाढीवर हळूहळू नियंत्रण येऊ लागले असून टाळेबंद केलेल्या सुमारे दोन हजार इमारती आणि २२ प्रतिबंधित क्षेत्रे निर्बंधमुक्त करण्यात आली आहे.

मुंबईच्या एका टोकाला असलेल्या कांदिवली, बोरिवली आणि दहिसर या उपनगरांमध्ये जून महिन्यात करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली होती. करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी येथील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये टाळेबंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची भूमिका पालिका आणि पोलिसांनी घेतली होती. तसेच रुग्ण सापडल्याने पूर्णत: अथवा अंशत: टाळेबंद केलेल्या इमारतींमध्ये संसर्गाचा प्रसार होऊ नये याची खबरदारी घेण्याची जबाबदारी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली. त्याचबरोबर आरोग्य तपासणी, ताप तपासणी शिबीर आदी विविध उपक्रमांच्या माध्यमांतून रुग्णांचा शोध सुरू करण्यात आला. सुमारे चार लाख २६ हजार ५९७ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील ४,०२२ जणांमध्ये करोनाची लक्षणे आढळून आली होती, तर ३,०१२ जणांची चाचणी घेण्यात आली असून ८०९ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले. सुमारे ४१ हजार ४३९ ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून १८३ जणांमध्ये प्राणवायू कमी असल्याचे तपासणीत निदर्शनास आले. तर १७४ ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. हळूहळू या भागात करोनामुळे निर्माण परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात पालिका यशस्वी होऊ लागल्याचे चित्र आहे.

इमारतींमध्ये रुग्ण अधिक

एकूण रुग्णसंख्येपैकी २,८५९ रुग्ण झोपडपट्टय़ांमध्ये, तर ५,३४९ रुग्ण इमारतींमध्ये सापडले आहेत. या तिन्ही उपनगरांवर दृष्टिक्षेप टाकल्यानंतर कांदिवलीच्या झोपडपट्टय़ांमध्ये १,३७०, तर बोरिवलीतील इमारतींमध्ये २,५२९ रुग्ण सापडल्याचे निदर्शनास आले. या सर्व रुग्णांच्या संपर्कात तब्बल दोन लाख २० हजार ५५८ जण आले होते. त्यापैकी ७२ हजार ०२४ जण अतिजोखमीच्या गटात, तर १ लाख ४८ हजार ५३४ जण कमी जोखमीच्या गटात होते. या सर्वाचा शोध घेण्यात पालिका यशस्वी झाली आहे. करोना काळजी केंद्र-१मध्ये १,५०५, तर करोना काळजी केंद्र-२मध्ये ३६९ जणांना दाखल करण्यात आले आहे.

२,१२७ इमारतींमधील टाळेबंदी उठवली

रुग्ण सापडल्यामुळे या उपनगरांमधील झोपडपट्टय़ांतील १२२ ठिकाणे प्रतिबंधित करण्यात आली होती. तर ३,५९३ इमारती टाळेबंद करण्यात आल्या होत्या. मात्र नवे रुग्ण न सापडल्यामुळे ३२ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात आली, तर २,१२७ इमारतींमधील टाळेबंदी उठविण्यात आली आहे.

पश्चिम उपनगरांमधील कांदिवली, बोरिवली, दहिसर भागातील करोनाच्या संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली आहे.

– विश्वास शंकरवार, उपायुक्त, परिमंडळ-७

रुग्णसंख्या

३,१८१ कांदिवली (आर-दक्षिण)

३,१७६ बोरिवली (आर-मध्य)

१,८६८ दहिसर (आर-उत्तर)

८,२२५  एकूण बाधित

४,४३१ एकूण रुग्णांपैकी बरे झालेले

३,३७३ अद्याप सक्रिय रुग्ण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 12:51 am

Web Title: coronavirus in kandivali boivali dahisar under control


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)