driver of Advani chariot did not get bed in the hospital zws 70 | अडवाणींच्या रथाचे सारथ्य करणाऱ्याला रुग्णालयात खाट मिळेना!

0
30
Spread the love

रुग्णालयाच्या व्हरांडय़ात खुर्चीत बसून ११ तास उपचार

डोंबिवली : देशात गाजलेल्या रामजन्मभूमी आंदोलनात अग्रेसर राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेवेळी त्यांच्या वाहनाचा चालक असलेले डोंबिवलीतील ज्येष्ठ कारसेवक सध्या शास्त्रीनगर रुग्णालयातील व्हरांडय़ात खुर्चीत बसून उपचार घेत आहेत. पालिकेच्या या रुग्णालयातील खाट उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर अशा प्रकारचे उपचार घेण्याची वेळ आली.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी १९९० मध्ये देशभर रथयात्रा काढली होती. या महिनाभराच्या कालावधीत त्यांच्या रथाचा चालक म्हणून डोंबिवली निवासी भाजपचे कार्यकर्ते सलीम मखानी काम पाहात होते. एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. मागील तीन दिवसांपासून अडवाणींचे हे जुने चालक आजारी आहेत. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील खासगी, पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी धावाधाव केली. परंतु कोठेही खाट मिळत नसल्यामुळे भाजपच्या या जुन्याजाणत्या कारसेवकाला अखेर महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. तिथेही खाट उपलब्ध नसल्याने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील व्हराडय़ांत सकाळपासून एका खुर्चीत बसून ऑक्सिजन पुरवठय़ावर ठेवण्यात आले होते.

पालिकेतील देखभाल-दुरुस्तीची अनेक कामे वर्षभर सलीमभाई करीत असतात. लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. पण सलीमभाई आजारी पडल्यानंतर त्यांना रुग्णालयाची गरज वाटली, तेव्हा त्यांना साहाय्य करण्यासाठी भाजपचा एकही लोकप्रतिनिधी पुढे आला नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. भाजपचे दोन आमदार, ४३ नगरसेवक पालिकेत आहेत. यामधील एकही सलीमभाईंच्या मदतीला धावून आला नाही, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगून तीव्र नाराजी व्यक्त केली.

शास्त्रीनगर रुग्णालयात कृत्रिम श्वसनयंत्रणेची दोन यंत्रे आहेत, तीही उपलब्ध नसल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले. मखानी हे दाऊद बोहरा समाजातील आहेत. या समाजाचे भायखळा येथे मदिना सर्वोपचारी रुग्णालय आहे. अखेर त्यांच्या मुखियाशी चर्चा करण्यात आली. त्यांनी मदतीची तयारी दाखविली. शनिवारी रात्री उशिरा भायखळा येथून कार्डिअ‍ॅक रुग्णवाहिका येऊन सलीमभाईंना उपचारासाठी घेऊन गेली. शास्त्रीनगर रुग्णालयाने सलीमभाईंना संशयित करोना रुग्ण म्हणून जाहीर केले. त्यांच्या फुप्फुसांना जंतुसंसर्ग झाला आहे. प्रकृती गंभीर होत असल्याने अखेर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी सलीमभाईंच्या नातेवाईकांनी संपर्क केला. आव्हाड यांनी तातडीने दोन महागडी इंजेक्शन सलीमभाईंना उपलब्ध करून दिली. त्यांची प्रकृती आता सामान्य आहे.

खुर्चीमध्ये बसून प्राणवायू

शास्त्रीनगर करोना रुग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्णांना खाटा उपलब्ध नसल्याने त्यांना बाहेरील बाकडय़ावर झोपवून किंवा खुर्चीत बसून प्राणवायूचा पुरवठा केला जातो. याठिकाणी दोन कृत्रिम श्वसनयंत्र आहेत. ती पूर्ण क्षमतेने काम करत नसल्याच्या तक्रारी आहेत. या रुग्णालयात करोना चाचणीसाठी येणाऱ्या संशयित रुग्णांना दुपारनंतर टोकन देऊन दोन ते तीन दिवसांनी चाचणीसाठी येण्यास सांगितले जाते, अशा तक्रारी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 4:03 am

Web Title: driver of advani chariot did not get bed in the hospital zws 70



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)