education mother tongue psychologist arun naik garja marathicha jayjaykar dd70 | गर्जा मराठीचा जयजयकार : ‘‘मातृभाषेतूनच शिक्षण हवं’’

0
66
Spread the love

मुग्धा बखले-पेंडसे / शुभांगी जोशी-अणावकर – [email protected]

‘‘आपल्याकडे विज्ञान आणि गणित हेच महत्त्वाचे शिकवण्याचे विषय आहेत असं मानलं जातं, पण भाषेच्या शिक्षणाला महत्त्व दिलं जात नाही. शिक्षणाचं माध्यमच मुळी भाषा असल्यामुळे भाषेवर पकड आल्याशिवाय इतर विषय शिकता येणं कठीण असतं. आपल्या मातृभाषेतूनच आपल्याला प्रथम आजूबाजूच्या परिसराचं ज्ञान होतं. त्यामुळे या भाषेतूनच जर शिक्षण मिळालं, तर ते विद्यार्थ्यांला नीट समजेल..’’ सांगताहेत मानसोपचारतज्ज्ञ आणि अभ्यासविषयक प्रशिक्षक अरुण नाईक मुलाखतीच्या या आजच्या पहिल्या भागात.

मराठी माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत यशस्वीपणे काम करणाऱ्या अनेक नामवंत व्यक्तींचे अनुभव आपण ‘गर्जा मराठीचा जयजयकार’ या सदरात वाचले आणि पुढेही वाचणार आहोत. या सर्वाच्या सांगण्यात एक धागा सामाईक होता, तो म्हणजे मातृभाषेत शिकल्यामुळे त्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट झाल्या आणि शिक्षणाच्या इमारतीचा पाया मजबूत झाला. त्यामुळे मातृभाषेचं महत्त्व वादातीत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘युनेस्को’च्या अहवालात मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या बालकांची आकलनशक्ती परक्या भाषेतून शिक्षण घेतलेल्या बालकांपेक्षा अधिक चांगली असते, असं म्हटलं आहे. मातृभाषेचं हे महत्त्व लक्षात घेऊनच ‘युनेस्को’नं ११ फेब्रुवारी हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ म्हणून साजरा केला जाईल, असं घोषित केलं आहे. यावरून जगभरात असणारं मातृभाषेचं महत्त्व लक्षात येतं.

मातृभाषेतून असलेल्या शिक्षणाचं महत्त्व, या शिक्षणाची प्रक्रिया आणि मुलांची मानसिकता हे जाणून घेण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ आणि प्रशिक्षक अरुण नाईक यांच्याशी संवाद साधला आणि मातृभाषेतून शिक्षण घेण्याविषयी चर्चा के ली. अरुण नाईक मानसोपचारतज्ज्ञ असून याच क्षेत्रात सल्लागार व प्रशिक्षक म्हणून सुमारे २७ र्वष कार्यरत आहेत. ‘इन्स्टिटय़ूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ’ या संस्थेशी ते जोडलेले असून त्यांची स्वत:ची ‘अस्तित्व’ ही संस्था आहे. सर्व वयोगटांसाठी समुपदेशन, मुलांसाठी अभ्यासविषयक कार्यशाळा, पालकांचं समुपदेशन, आपल्यातील ‘सॉफ्ट स्किल्स’, ताणतणावाचं नियोजन या विषयांवर विविध सरकारी आणि खाजगी  संस्थांमध्ये प्रशिक्षणं आयोजित करणं हे त्यांचं कार्यक्षेत्र आहे.

प्रश्न : सर्वप्रथम मातृभाषा, शिक्षण या संकल्पनांबद्दल सांगाल का? शिक्षणाची प्रक्रिया कशी होत असते?

अरुण नाईक : सर्वसाधारणपणे सांगायचं झालं तर आपल्या घरात बोलली जाणारी भाषा ती मातृभाषा. खरं म्हणजे शिकणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. शिकण्याची अगदी सोपी व्याख्या करायची झाली तर समोर आलेला अनुभव समजून घेणं म्हणजे शिकणं. ही गोष्ट माणूस पूर्वापार करतच आला आहे. किंबहुना म्हणूनच तो टिकला आहे.

प्रश्न : हो. त्या अर्थी माणूस काय अथवा मूल काय, सतत शिकतच असतं कारण ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मग शाळेतलं शिक्षण म्हणजे काय?

अरुण : शाळेतलं शिक्षण म्हणजे संस्थात्मक शिक्षण अथवा ‘मास एज्युकेशन’. हा प्रकार औद्योगिकीकरणानंतरच आलेला आहे. कारण त्याच्या आधीही लोक घरातून, परंपरागत व्यवसायांतून शिकतच होते. पण औद्योगिकीकरणानंतर जे कारखाने आले, कार्यालयं आली, त्यात काम करणारा कर्मचारीवर्ग तयार करण्यासाठी शाळा निर्माण झाल्या. म्हणजे जसं मोठय़ा प्रमाणावर उत्पादन होऊ लागलं तशी मोठय़ा प्रमाणात कामगार, कर्मचारी यांची गरज भासू लागली. परंपरागत व्यवसायापेक्षा भिन्न- म्हणजे इलेक्ट्रिशियन, ड्राफ्टस्मन असे नवीन व्यवसाय निर्माण झाले. कार्यालयात काम करण्यासाठी लिहिता-वाचता येणं गरजेचं होतं. त्यासाठी एक व्यवस्था म्हणून सामुदायिक शिक्षण देणाऱ्या शाळा, महाविद्यालयं या संस्था निर्माण झाल्या.

प्रश्न : या शालेय शिक्षणाची उद्दिष्टयं काय होती? कसं आणि काय प्रकारचं शिक्षण देणं अपेक्षित आहे?

अरुण : जेव्हा आपण शिकतो, तेव्हा त्यात दोन गोष्टी असतात- एक विज्ञान आणि दुसरं तंत्रज्ञान. या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालत असतात आणि एकमेकांच्या प्रगतीला हातभार लावत असतात. विज्ञानात ‘थिअरी’- म्हणजे शास्त्र असतं आणि तंत्रज्ञानात त्याचा वापर केलेला असतो. युरोपात जेव्हा सुधारणा किंवा ज्याला पुनर्जागरण अर्थात ‘रेनेसान्स’ म्हणतात तो काळ आला, तेव्हा विज्ञानाच्या प्रसाराला चालना मिळाली. जग जसजसं जवळ येऊ लागलं, जगात ज्ञानाची देवाणघेवाण वाढली, तसतसं विज्ञान आणि तंत्रज्ञान वाढू लागलं. तसंच समाजशास्त्र, अर्थशास्त्र अशी नवनवीन शास्त्रं आणि संकल्पना उदयास येऊ लागल्या. हे सर्व सिद्धांत, संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम शाळा, महाविद्यालयं करतात. या संकल्पना अमूर्त असतात. पण ‘मूर्त’कडून ‘अमूर्ता’कडे जाणं हे शिक्षणाचं सूत्र असतं. म्हणजे गणितामध्ये आपण आधी अंक मोजायला शिकतो. असं हळूहळू टप्प्याटप्प्यानं आपण पुढे पुढे जात असतो.

प्रश्न : शिक्षणाची भाषा कोणती असावी?

अरुण : आपल्या आयुष्यात आलेल्या अनुभवांतून आपण शिकत असतो. पण जर मला माझ्या आजूबाजूच्या परिसराला समजून घ्यायचं असेल, तर मला दिसणाऱ्या गोष्टींना काय शब्द वापरले जातात ते कळलं पाहिजे, आणि हे शब्द मी ज्या परिसरात वावरत असतो त्या परिसरातल्या भाषेत असतात. त्या भाषेच्या शब्दांतून मला परिसराचं ज्ञान होतं. म्हणून माझ्या परिसराच्या भाषेतून जर मला शिकवण्यात आलं, तर ते मला नीट समजेल. आता हे बघा, जेव्हा मूल शाळेत जातही नसतं तेव्हा ते भाषा बोलायला लागतं. त्याला कोणी त्या भाषेचं व्याकरण शिकवलेलं नसतं, तर ऐकून ऐकून त्यानं त्या शब्दांचे अर्थ आणि भाषा बोलण्याचं व्याकरण समजून घेतलेलं असतं. त्यामुळे एखादी गोष्ट समजून घ्यायची असेल तर शब्दांचे अर्थ लागायला हवेत. मुलं जेव्हा पूर्ण वाक्य ऐकतात तेव्हा त्या शब्दांचा अर्थ ती लावतात.

प्रश्न : म्हणजे कसं?

अरुण : उदाहरण देतो. माझ्याकडे आलेल्या तिसरीतल्या एका मुलाला मी एक धडा वाचायला सांगितला. ‘माय फॅमिली’ या त्याच्या धडय़ात ‘सम चिल्ड्रन रिझेम्बल देअर ग्रँडपेरेंट्स, अंकल्स’ असं एक वाक्य होतं. त्याला या वाक्याचा अर्थ विचारल्यावर तो ‘रिझेम्बल’ या शब्दावर अडखळला आणि त्याचा अर्थ त्यानं ‘रिस्पेक्ट’ असा सांगितला. यामागचं कारण विचारल्यावर तो म्हणाला, की पुढे ‘ग्रँडपेरेंट्स’ लिहिलं आहे. म्हणजे मोठय़ा माणसांचा आदर करायचा असतो म्हणून तो त्या वाक्याचा अर्थ असावा असा तर्क त्यानं मांडला होता. म्हणजे मुलांना शिकवताना फक्त शब्दार्थ शिकवून चालत नाहीत, तर संकल्पना समजण्यासाठी वाक्यं लागतात. जी वाक्यं माझ्या आजूबाजूला बोलली जातात, जी भाषा सतत माझ्या कानावर पडत असते, ती भाषा मी पटापट उचलू शकतो, आणि मग त्या भाषेत मला संकल्पना लवकर आणि सहज समजू शकतात.

प्रश्न : मूर्त संकल्पनांकडून अमूर्त संकल्पना शिकताना जर मला भाषेचं ज्ञान चांगलं असेल तर मला कळायलाही सोपं जाईल. नाहीतर एकीकडे नवीन भाषा शिका आणि त्याच वेळी नवीन संकल्पनाही शिका, यात त्रास होऊ शकतो ना?  

अरुण : हो. त्यातून मग मुलांचा गोंधळ होतो. कारण अमूर्त संकल्पना समजण्यासाठी ती उलगडून शिकवावी लागते. ती उलगडण्याची क्रिया भाषेतूनच होते, आणि जर ती भाषा, वाक्यरचनाच मुलांना कळली नाही तर त्या संकल्पनेचा अर्थच लागू शकत नाही. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या कित्येक मुलांनासुद्धा अनेक शब्दांचे अर्थ माहीत नसतात. ते एकदम छान वाचू शकतात, पण ‘म्हणजे काय रे?,’ असं विचारलं की त्यांना सांगता येत नाही. अगदी सुरुवातीपासून इंग्रजी माध्यमात शिकलेल्या नववीतल्या विद्यार्थ्यांलादेखील ‘रिलिजन’ या शब्दाचा अर्थ सांगता येत नाही. मग ‘रिलिजन’ मुळे होणाऱ्या ‘मॅनमेड डिझास्टर्स’ म्हणजे दंगली, दहशतवाद या गोष्टी त्यांच्या आकलनापलीकडे जातात.  मग शब्दांचे अर्थ न समजता होते फक्त घोकंपट्टी. परीक्षेत गुण मिळवण्यासाठी.

प्रश्न : हे असं निम्नस्तरीय आर्थिक वर्गात आढळतं का, म्हणजे जिथे पालकांकडून अभ्यासात मदत होऊ शकत नाही तिथे?

अरुण : हे सर्व स्तरांमध्ये आढळतं. यामागचं कारण असं की, दुर्दैवानं आपल्या इथे विज्ञान आणि गणित हेच महत्त्वाचे शिकवण्याचे विषय आहेत असं मानलं जातं, पण भाषेच्या शिक्षणाला महत्त्व देत नाहीत. शिक्षणाचं माध्यमच मुळी भाषा आहे, आणि त्या भाषेवर पकड आल्याशिवाय इतर विषय शिकता येणं कठीण आहे. तुम्ही फार तर दहावी-बारावीपर्यंत खेचू शकाल. पण त्यानंतर जेव्हा अभ्यासक्रम वाढलेला असतो आणि स्वत: अभ्यास करणं अपेक्षित असतं, तेव्हा तिथे मुलं अडखळतात.

प्रश्न : मध्यंतरी एका संशोधनपर लेखात असं लिहिलं होतं की हल्ली बहुराष्ट्रीय कंपन्या भाषाविकास आणि संवादकला यांचं प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देत आहेत.

अरुण : ही गरज का भासते? कारण आपण मुलांना भाषेत व्यक्त होण्याची संधीच देत नाही. अगदी निबंध लिहितानासुद्धा मुलांना आपले विचार, मतं लिहूच देत नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे उपजत भाषाविषयक क्षमता आहे, ती मुलं वगळता बहुतेकांना अडचणी येतच असतात. ही मुलं निव्वळ घोकंपट्टीवर तरून जात असतात. अशा मुलांना मग कामाच्या ठिकाणी भाषाविकास आणि संवादकला यांचं प्रशिक्षण द्यावं लागतं. मागच्या वर्षी राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाची टक्केवारी खाली घसरली, कारण परीक्षेचा आकृतिबंध बदलला. या परीक्षा पद्धतीमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न होते, पण उत्तरं देण्यासाठी धडे समजणं गरजेचं होतं. त्यात पाठांतराला वाव नव्हता. धडे समजून घेण्यासाठी शब्दांचे अर्थ समजणं गरजेचं आहे. म्हणजे परत भाषा आली. या वर्षी जर हे ओळखून शिक्षकांनी, मुलांनी काम केलं असेल तर ठीक, नाही तर परत तेच होईल.

प्रश्न : खरं आहे. पण एकीकडे परिसर भाषेतून शिक्षण घ्यायचं म्हटलं तर मुलं पुढचं शिक्षण इंग्रजीतून कसं घेऊ शकतील अशी पालकांच्या मनात काळजी असते.

अरुण : या सगळ्यात गोंधळ कसा असतो बघा. आज भारतात, मुंबईत बऱ्याच सामाजिक संस्था आर्थिकदृष्टय़ा दुर्बल मुलांना इंग्रजी बोलायला शिकवत आहेत. पण फक्त जुजबी बोलण्यापुरतं, मॉलसारख्या ठिकाणी काम करण्यासाठी शिकवत आहात, की संकल्पना मांडणं, त्यांच्या क्षमता विकसित करण्यासाठी शिकवत आहात, हा खरा कळीचा मुद्दा आहे.

या सगळ्यांचा गैरसमज आहे, की इंग्लिश बोलता आलं की सर्व झालं. पण ते तसं नाही. आपली मातृभाषा जर आपल्याला चांगली येत असेल, तर इंग्लिश शिकताना त्यातल्या शब्दांचे अर्थ आणि त्यांचे वाक्यात होणारे उपयोग नीट कळून घ्यायला मदत होईल. हे जमू लागलं की ही नवी भाषा चांगली येणं कठीण जाणार नाही.

(मातृभाषेचं आपल्या व्यवहारातील  महत्त्व सांगणारा या मुलाखतीचा भाग दुसरा २५ जुलैच्या अंकात)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 1:13 am

Web Title: education mother tongue psychologist arun naik garja marathicha jayjaykar dd70Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)