from depression to hope niramay gharte dd70 | निरामय घरटं : निराशेतून आशेकडे

0
43
Spread the love

उमा बापट – [email protected]

प्रत्येकाच्या स्वभावाच्या जशा नाना तऱ्हा असतात, तशाच आपण रोज विविध भावछटा अनुभवत असतो. कधी उत्साह, मधूनच कंटाळा, निरिच्छा, मेहनत करतानाही कधी आळस येणं, कधी नाराजी, उदासी, संयमित जगताना तोल सुटेल का असं जणू कडय़ावर लोंबकळणंही क्वचित प्रसंगी होऊ शकतं. त्याची कारणं वेगवेगळी असतात. भावनांचा स्वीकार करत, कमतरता जाणून घेऊन बदलायचं ठरवलं तर प्रयत्नपूर्वक बदल होऊ शकतो. निराशेतून आशेकडे उभारी घेणारी झेप हा आपल्या घरटय़ाचा स्थायीभाव व्हावा.

असीमनं जपलेला एक छोटासा दगड सापडत नव्हता म्हणून तो अगदी हिरमुसला होता.. आज रोशनीला तिच्या खास मैत्रिणींनीच एकटं पाडलं. त्यामुळे रोशनीचं सगळंच बिनसलं होतं.. महिनाभर अतिशय मेहनतीनं काम करून एक महत्त्वाचा प्रकल्प नितीननं ऑफिसमध्ये सादर केला; पण जे बदल त्यानं प्रकल्पाच्या आराखडय़ात सुचवले होते ते रास्त असूनही त्याच्या प्रस्तावाची दखल घेतली गेली नाही.. वेणूची नवी कविता प्रसिद्ध झाली. कविता आवडल्याचे खूप फोन, निरोप तिला येत असूनही वेणू दिवसभर अस्वस्थ होती. तिच्याकडे घरकामाला येणाऱ्या मावशींकडे वरचेवर त्यांच्या नवऱ्याचं दारू पिऊन त्रास देणं वाढत चाललं होतं आणि ही परिस्थिती बदलायला वेणू फारसं काही करू शकत नव्हती. आयुष्यभर प्रामाणिक निष्ठा बाळगून अरुणकाका वैद्यक सेवा देत आले. आता त्यांनी निवृत्ती स्वीकारली असली तरी ‘करोना’काळात वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना वाईट वागणूक दिल्याची बातमी कानावर आली तरी काकांना हताश वाटतं..

असीमपासून अरुणकाकांपर्यंतचे हे अनुभव आपल्यापैकी बहुतेकांनी कधी ना कधी घेतले असणार. आवडीच्या वस्तूपासून दुरावल्यामुळे हिरमुसणं, इतरांच्या वागण्यामुळे दुखावलं जाणं, आपल्या हातात जे होतं ते सारं केल्यानंतरही वाटय़ाला येणारी  हतबलता, स्वत:चं सगळं व्यवस्थित असून आणि दुसऱ्याला मदत करण्याची इच्छा असूनही जाणवणारी असहाय्यता आणि प्रत्यक्ष आपल्याला एखाद्या गोष्टीची झळ पोहोचत नसली तरी आजूबाजूच्या अनास्थेमुळे येणारी उदासीनता. या साऱ्या भावछटा  स्वाभाविक आहेत. आजूबाजूच्या संवेदनारहित वातावरणानं आपण अस्वस्थ होणार नसू, कधी आपण दुखावले जाणार नसू, तर आपल्या संवेदना बोथट झाल्या आहेत का हेही चाचपडण्याची ती वेळ आहे. माणूसपण जिवंत असेल, तर निराशाजनक बाबींमुळे  प्रसंगी निराश वाटणं नैसर्गिक आहे; पण ही अवस्था येते तशी जातेही. कधी काळ हे औषध असतं, कधी जाणीवपूर्वक प्रयत्न करून त्यातून बाहेर पडता येतं. तर कधी परिस्थिती बदलते म्हणून मानसिक स्थिती सुधारायला मदत होते.

निराश वाटणं आणि नैराश्यानं ग्रासणं या मात्र भिन्न अवस्था आहेत. मानसिक आजारात दीर्घकाळ राहणं आणि निरोगी माणसाला कधी तरी जाणवणारी भावना यात अंतर आहे. हल्ली मात्र काही इंग्रजी, पारिभाषिक संज्ञा बोली मराठी भाषेत गुळगुळीत करून वापरलेल्या बघायला मिळतात. ‘डिप्रेस वाटणं’ हा असा एक वरचेवर वापरला जाणारा शब्दप्रयोग आहे. साधं मनाविरुद्ध झालं तरी हल्ली काहींना ‘डिप्रेस’ वाटतं. आपण ‘डिप्रेशन’मध्ये आहोत असं वाटायला माध्यमिक शाळेतली मुलंही कमी करत नाहीत. त्यांचं तीच हे ठरवून टाकतात ही त्यातली मुख्य खटकणारी बाब. अशा व्यक्तींना समुपदेशनातून स्वत:च्या भावना ओळखायला, त्या भावनांवर ताबा मिळवायला टप्प्याटप्प्यानं मदत केल्याचा फायदा होतो.

जेव्हा निराशा घेरून टाकते, रोजच्या व्यवहारांवर विपरीत परिणाम करते, अशा वेळी तज्ज्ञांच्या सल्लय़ानं योग्य तो वैद्यकीय आणि मानसोपचार घेणं गरजेचं आहे. गंभीर मनोविकार टाळण्यासाठी वेळीच नेमके उपचार करणं महत्त्वाचं; पण अशी वेळ न येऊ देणं आपल्या हातात असतं. या सदरातल्या लेखांमध्ये आपण पूर्ण जीवनशैलीचा विचार करतो आहोत. गेल्या काही लेखांमध्ये मांडलेले सकारात्मक पैलू आपण रोजच्या साध्या गोष्टींमध्येही सोबत घेऊन जगत असू तर निराशेची मरगळ झटकता येईल. ‘निर्भय कणखरपणा’ (६ जून) राखून ‘निंदा निभावण्याची’ (९ मे) कुवत वाढवता येते, हे तर आपण बघितलं. निराशा ओलांडून पुढे जायला फक्त वरवरची मलमपट्टी पुरत नाही. तात्पुरतं विसर पडून गाडी ढकलली असं नसतं. असीमला त्याची आजी दुसरा सुंदर दगड देत होती, पण तो कसा चालेल त्याला?.. रोशनीचा दादा तिला म्हणाला की, बॅडमिंटन खेळू या. तरी रोशनी नुसती गप्प गप्पच.. नितीनच्या बायकोनं त्याच्या आवडीचा जेवणाचा बेत केला, पण एरवी खवय्या असला तरी त्या दिवशी त्याला जेवणात रस नव्हता.. निरिच्छा जायला, नाराजीचे टक्केटोणपे खायला पर्यायी मार्ग शोधायला लागतात. त्यासाठी जणू तालमीत शारीरिक ताकद कमावतात तसं मानसिक बळ एकवटायला नियमित सराव, सवयी, अनुभव आणि कृतिरूप संस्कार गाठीशी लागतील.

असीमचा दगड हरवला म्हणून तो हिरमुसला हे मान्य. त्याचं काही काळासाठीचं हिरमुसणं स्वीकारणं ही त्याच्या घरच्यांची जबाबदारी. हिरमुसण्याचा बाऊ करून दिवसभर ज्याला-त्याला असीमचा दगड हरवल्याची रडकथा जर आजी सांगत राहिली तर असं रडगाणं गायचे संस्कार असीमवर होऊ शकतात. त्याऐवजी दगड हरवला हे असीमला लहान वयातसुद्धा त्याच्या परीनं पचवायला शिकवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. वाईट वाटत असताना स्वत:च पर्याय शोधायचे असतात, असेही संस्कार होऊ शकतात. जसं, त्या दगडाचं चित्र काढतोस का? दगड घेऊन तू अजून काय-काय करणार होतास ते आठवायचं आहे का? पुन्हा असं हरवायला नको म्हणून अजून तुझ्या लाडक्या वस्तू कोणत्या आहेत आणि त्या तू नीट ठेवल्यास का ते बघू या, असं म्हणता येईल. रोशनीच्या वयात मैत्रिणींनी एकटं पाडणं याभोवती तिचं भावविश्व बिघडू शकतं. अशा वेळी कोणी नि:शंक ऐकणारं असेल तर सकारात्मक फरक पडू शकतो. दुसरे आपल्याबद्दल काय ठरवतात यापेक्षाही स्वत:ला स्वत:बद्दल काय वाटतं, अशी स्वप्रतिमा तयार करता येते. अनुभवातून हे शिकण्यासाठी शिक्षक, पालक, कुटुंबीय या सगळ्यांचा वाटा असू शकतो. शाळेत जेव्हा एखादं मूल एकटं पडतं तेव्हा वर्गशिक्षक सगळ्यांशी याबद्दल बोलू शकतात. जोडीकार्य, गट प्रकल्प तसंच वेगवेगळ्या इयत्तांतील मुलांचा एकमेकांशी संपर्क येईल असे विविध उपक्रम शाळेत होऊ शकतात. यातून मुलं एकमेकांसोबत राहायला, मिळून काम करायला शिकत जातात.

आपण एखादी उदासवाणी घटना कशी निभावून नेऊ हे अनेक घटकांवर अवलंबून असतं. अनपेक्षित घटना घडल्यावर त्याला तोंड द्यायची वृत्ती, आजूबाजूचं वातावरण, समविचारी लोक आपल्यासोबत कसे, किती जोडलेले आहेत याचा परिणाम निराशेला सामोरं जाताना होत असतो. भक्कम पाठिंबा असणारे कुटुंबीय, स्नेही सोबत असतील तर त्या आश्वासक आधारामुळे आशावादी राहायला सोबत होते. वरती पाहिलेल्या उदाहरणात नितीनला समजून घेणारी घरची मंडळी, मित्र आणि कामातले सहकारी असतील तर तो निराशा पचवताना पूर्ण खचून जाणार नाही. जे बदलू शकत नाही त्याचाच नुसता विचार करत बसण्याऐवजी जे करणं शक्य आहे तिथून सुरुवात करणं, एका वेळी एक छोटं पाऊल उचलणं, असं वेणूच्या उदाहरणात करून बघता येईल. कामवाल्या बाईच्या घरचं वातावरण नियंत्रित करणं वेणूच्या हातात नाही; पण पैशांची बचत कशी करता येईल याचं मार्गदर्शन कामवाल्या मावशींना करणं वेणूला जमू शकतं. यामुळे असहाय्यता जाऊन आपण आपल्या परीनं मदत केल्याचं समाधान मिळायला सुरुवात होते. हताश वाटत असताना फिरून एकवार प्रयत्न करणं तितकं सोपं नसतं. ‘नि:स्पृह देणं’ (१४ मार्च) आणि ‘निरलस श्रमणं’ (११ एप्रिल) अंगी मुरलेलं असेल तर सातत्यानं वेगवेगळ्या स्वरूपांत काम करत राहणं जमू शकतं. वरच्या उदाहरणातील अरुणकाका ‘करोना’च्या आपत्तीत वैद्यक सेवेचं असलेलं महत्त्व लेखनातून, संवादातून जनमानसापर्यंत पोहोचवू शकतात.

मानसशास्त्रातल्या काही उपशाखांचा सुरुवातीच्या काळात मनोविकारांच्या अभ्यासावर आणि उपचारांवर काही प्रमाणात भर होता; पण अलीकडच्या काळात सकारात्मक मानसशास्त्र- ‘पॉझिटिव्ह सायकॉलॉजी’ हा शास्त्रशुद्ध अभ्यासाचा उपविषय मानला जातो. आशावाद आणि आशा यावर अनेक प्रकारे संशोधन चालू आहे. नकारात्मक लक्षणांवर उपचार करणं ही जशी मनोविकाराच्या समस्येला हाताळण्याची एक पद्धत, त्याबरोबर ‘होप थेरपी’सारख्या संकल्पना आता पुढे येऊ लागल्या आहेत, ज्यात सकारात्मक पैलूंवर भर देऊन आव्हान झेलणं याला अग्रक्रम मिळतो. नैराश्यामुळे गंभीर मानसिक आजार नसतानादेखील काही पद्धती आपण आत्मसात करू शकतो. रोजच्या आयुष्यात स्वत:पासून सुरुवात करू या. आपल्या मुलांच्या वयाला साजेशा रीतीनं मानसिक बळ मिळवण्याच्या या सवयी लावून घेऊ या. आपल्याला काय मिळवायचं आहे, त्यासाठी काय काय पर्याय आहेत आणि काय अडचणी  आहेत, त्याकडे संधी म्हणून कसं बघता येईल, हे नित्य जगू या. ‘करोना’च्या टाळेबंदीच्या परिस्थितीत बागेत का जायचं नाही, हे समजण्याच्या पलीकडच्या वयातल्या मुलांबरोबर घरी गादीच्या गुंडाळ्या करून घसरगुंडी, चादरीचा झोपाळा असे खेळ खेळत बागेतल्या मजेचे पर्याय सारं घरच हसत, बागडत अनुभवतं. तेव्हा ‘निराशेची छाया, आयुष्याच्या  संध्याकाळीही भिववती हृदया’ हे चित्र उमटणं अवघड. आयुष्यभर वेचलेल्या एकेका निरागस काडीच्या सोबतीनं सकारात्मकतेचं समृद्ध निखळ जगणं, निर्भय कणखरतेनं निराशा आणि आशा यातली नेमकी निवड करणारं होईल. ‘निरनिराळे सारे’ अशा  परिस्थितीतही नवनव्या आशा अंकुरत ‘दिल हे छोटासा, छोटीसी आशा’ हे आशेचे स्वर आपल्या निरामय घरटय़ात रुंजी घालोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 12:07 am

Web Title: from depression to hope niramay gharte dd70Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)