Ganesh idol makers facing major financial crisis zws 70 | गणेश मूर्तिकार द्विधा मनस्थितीत

0
25
Spread the love

अजूनपर्यंत १० टक्के ही मागणीची नोंद नाही

वाडा :   गणपती उत्सव दीड महिन्यावर येऊन ठेपला असताना या वर्षी घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींच्या मागणीची नोंदणी  १० टक्के सुद्धा न झाल्याने गणपतीच्या मूर्ती बनविणारे  व्यावसायिक  अडचणीत सापडले आहेत. दरवर्षीच्या मागणीइतके गणपती  बनवून तयार झाले आहेत, मात्र या गणपतींचे रंगकाम करायचे की नाही, या द्विधा मनस्थितीत हे मूर्तिकार आहेत.

वाडा, कुडूस, गोऱ्हे येथील विविध गणपती कारखान्यात  दरवर्षी १५ ते १७  हजार गणपतीच्या मूर्ती बनविल्या जातात. यामधील काही कारखानदारांचा वर्षभर हाच व्यवसाय सुरू असतो. अर्ध्या फुटापासून ते सात फुट उंचीपर्यंत येथे गणपती बनविले जातात. ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यांतून वाडा येथील गणपतींच्या मूर्तीना मागणी असते.करोना विषाणूच्या संकटामुळे या वर्षी प्रत्येक सण, उत्सवावर मर्यादा आल्या आहेत. अनेकांनी या उत्सवांना घरगुती स्वरूप दिले आहे, तर अनेकांनी या वर्षी हे उत्सवच साजरे न करण्याचा निर्णय घेतला आहे. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला  गणेशाचे आगमन होत असते. या वर्षी  २२ ऑगस्टला गणेशाचे आगमन होत आहे. गणेशाच्या आगमनाला  अवघा दीड महिना राहिला तरी अजूनपर्यंत १० टक्के सुद्धा गणपती मूर्तींची नोंदणी झाली नसल्याचे व्यावसायिक सांगतात.  दरवर्षी मे महिन्याच्या अखेपर्यंत सर्व गणपतींची आगाऊ  मागणी होत असते. या वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर जुलै महिना सुरू झाला तरी  ग्राहकांनी नोंदणी केलेली नाही असे येथील  व्यावसायिकांनी सांगितले.

वाडा तालुक्यातील मौजे पाली येथे स्नेहल कला केंद्रामध्ये वर्षभर गणपती तयार केले जातात.  टाळेबंदीपूर्वीच या कारखान्यात बाराशेहून अधिक एक फूट उंचीपासून ते सात फूट उंचीपर्यंत गणपतीच्या मूर्ती बनवून तयार आहेत. मे महिन्यामध्येच दरवर्षी एक हजार मूर्तींची नोंदणी पूर्ण होत असते, मात्र या वर्षी आतापर्यंत फक्त ५० गणपतींची नोंदणी झाली असल्याचे या कारखान्याचे मालक कल्पना वासुदेव ठाकरे यांनी सांगितले.

मार्च महिन्यापासून या व्यवसायाला सुरुवात करणाऱ्या काही  मूर्र्तिकारांना   टाळेबंदीमुळे माती, रंग व अन्य साहित्य उपलब्ध करता न आल्याने त्यांना या व्यवसायाला सुरुवात करताच आलेली नाही.

करोनाचे  विषाणू संसर्गाचे संकट सर्वच उद्योग, व्यवसायावर आले आहे. त्याला आता सामोरे जाणे एवढेच आपल्या हातात आहे.

-कल्पना वासुदेव ठाकरे,  स्नेहल कला केंद्र पाली, ता. वाडा.

करोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी आम्ही अवघ्या तीन फूट उंचीपर्यंत गणपती मूर्तीची नोंदणी करून शासनाच्या  सर्व नियमांचे पालन करणार आहोत.

-चंद्रकांत केणे, अध्यक्ष, अष्टविनायक युवा मित्रमंडळ खंडेश्वरी नाका, वाडा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 2:27 am

Web Title: ganesh idol makers facing major financial crisis zws 70Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)