helping hand of Natya Parishad branch to the artists zws 70 | टाळेबंदीचा कलाकारांनाही फटका, काहींनी वेगळी वाट निवडली

0
24
Spread the love

टाळेबंदीचा कलाकारांनाही फटका, काहींनी वेगळी वाट निवडली

नाशिक : करोनामुळे लागु झालेल्या टाळेबंदीचा फटका अनेकांना बसला आहे. कलाक्षेत्रही यास अपवाद नाही. आधीच अस्थिर असलेल्या कला क्षेत्रात ‘काम तेव्हां दाम’ अशी स्थिती आहे. चार महिन्यांपासून नाटय़गृह, मालिका, चित्रपट सारे काही बंद असल्याने कला क्षेत्रात रंगमंचावर काम करणारे तसेच रंगमंचामागे वावरणाऱ्या कलावंतांनी आपली वेगळी वाट निवडली आहे. अशा कठीण परिस्थितीत नाटय़ परिषदेच्या स्थानिक तसेच मध्यवर्ती शाखेकडून गरजु रंगकर्मीना आर्थिक मदत करण्यात आली आहे.

करोनामुळे लागु झालेल्या टाळेबंदीला चार महिने उलटले. या टाळेबंदीमुळे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यात केंद्र सरकारने काही उद्योग, व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली. परंतु, कामाने अद्याप वेग घेतला नसल्याने आर्थिक दृष्टचक्र भेदायचे कसे, हा प्रश्न प्रत्येकाला सतावत आहे. कला क्षेत्रही यास अपवाद नाही. नाशिक शहर कला संस्कृतीचे माहेरघर आहे. शहर तसेच जिल्ह्य़ात हौशी कलावंतासह प्रायोगिक रंगभूमीवर आपला स्वतंत्र ठसा उमटविणारी मंडळी आहेत. नाशिकची कला क्षेत्राची वाटचाल पाहता या ठिकाणी चित्रसृष्टी निर्मितीसाठी शासन दरबारी पाऊले टाकण्यास सुरूवात झाली आहे. परंतु, करोनामुळे या सर्व कामाला खीळ बसली आहे. चार महिन्यांपासून चित्रपटगृह, नाटय़गृह, मालिकांचे चित्रीकरण बंद आहे. त्यामुळे कलावंत, तंत्रज्ञ यांना काम नाही. जमा असलेली आर्थिक पुंजी टाळेबंदीच्या पहिल्या दोन टप्प्यात संपल्यानंतर अनेकांनी काम पूर्ववत होईपर्यंत व्यवसायात अनपेक्षित मिळालेल्या ‘मध्यांतर’ चा क्षणभर विश्रांती म्हणून उपयोग करण्यास सुरूवात केली आहे.

काहींनी वेगळे काम सुरू केले तर काही मिळेल ते काम करण्याच्या तयारीत आहेत. याविषयी दिग्दर्शक भगवान पाचोरे म्हणाले यांनी टाळेबंदी संपेपर्यंत तसेच कामामध्ये नियमितता येईपर्यंत ऑनलाइन पध्दतीने भाजी विक्री व्यवसाय सुरू केला असल्याचे सांगितले. त्यांनी ‘रानवारा व्हेजिटेबल कंपनी’ सुरू केली असून या माध्यमातून ५०० ग्राहकांना भाजी पुरवठा करण्यात येत आहे. दुसरीकडे दिग्दर्शनाशी संबधित नवीन प्रकल्पावर काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. कालिदास कलामंदिर नाटय़गृहात कलावंतांना जेवण पुरविणारे राजेंद्र क्षीरसागर यांनी आपली आर्थिक विवंचना मांडली. तीन महिन्यांपासून हाताला काम नाही. घरात चार सदस्य आहेत. आर्थिक विंवचना सोडविण्यासाठी वडापाव, मिसळपाव पार्सल सेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतु, टाळेबंदीमुळे ग्राहक खबरदारी घेत असल्याने हे कामही गेले. सध्या कोणी वाढदिवस किंवा अन्य काही कार्यक्रमांसाठी १०-१२ लोकांचे जेवण, अल्पोहार मागवितात. ते पुरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मराठी नाटय़ परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे गरजु कलावंतांना घरपोच किराणा, धान्य देण्यात आले. तसेच अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद मध्यवर्ती शाखेकडे शहरातील २६ गरजु रंगकर्मीची यादी देण्यात आली. राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून आर्थिक मदतीची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. शहरातील गरजु कलावंतांच्या खात्यात दोन हजार ५०० रुपये जमा झाल्याची माहिती नाटय़ परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 2:13 am

Web Title: helping hand of natya parishad branch to the artists zws 70Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)