human emotions physcroscope dd70 | सायक्रोस्कोप : भावनांचे अर्धविराम!

0
46
Spread the love

डॉ. अंजली जोशी – [email protected]

आपल्या सगळ्यांच्याच जीवनात कुठले ना कुठले कप्पे अर्धवट राहिलेले असतात. कितीतरी गोष्टींची उत्तरं अनिर्णीत राहिलेली असतात. कधी जिवाभावाच्या मत्रीचे धागे अचानक उसवले जातात, कधी एखाद्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे अनेक खुलासे अर्धवट राहतात, कधी आपल्याबद्दल विनाकारण ग्रह करून घेतले जातात, तर कधी इतरांच्या कठोर वागण्यानं मनावर ओरखडे उमटलेले असतात. चीड,  तिडिक, दु:ख , निराशा, अपेक्षाभंग यांसारख्या अनेक अस्वस्थकारक भावना मलमपट्टी न होताच मनाच्या तळाशी अर्धविरामात साठून राहतात. प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असतेच. तसा याही अर्धविरामाचा विचार के ला तर त्या भावनांना विराम देता येईल..

‘‘मी जेव्हा आईचा विचार करते तेव्हा वाटतं, की आम्हा दोघी बहिणींमध्ये तिनं प्रियाला कायम झुकतं माप दिलं. प्रिया शेंडेफळ म्हणून तिला मोकळीक दिली, आणि मला मात्र कडक शिस्तीच्या धाकात ठेवलं. प्रियाला चित्रकलेची आवड नि  मला स्वयंपाकाची. पण प्रियानं नवीन चित्र काढलं की आई कोण कौतुक करायची, आणि मी नवीन पदार्थ केला की मला मात्र किती पसारा घातलास म्हणून बोलायची. आई तीन वर्षांपूर्वी वारली. पण तिच्या अशा वागणुकीचे ओरखडे माझ्या मनातून अजून पुसले गेले नाहीत. विशेषत: टाळेबंदीच्या काळात स्वत:बरोबर जास्त वेळ मिळाला असताना तर या ओरखडय़ांच्या जखमा जास्तच ठुसठुसायला लागल्या. एक प्रश्न मला वरचेवर छळत राहतोय, की पोटच्या मुलींमध्ये असा भेदभाव आईनं का केला? ’’ नम्रताला तिच्या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही.

केतन म्हणतो,‘‘सोनलनं असं तडकाफडकी ब्रेक-अप का केलं याचा विचार करून मेंदूचा भुगा व्हायची पाळी आली. तरी मला कारण कळत नाही. आमच्यात ना काही भांडण झालं होतं, ना काही वादविवाद. सहा महिन्यांपूर्वी अचानक फेसबुकवर ‘इन अ रिलेशनशिप’ हे स्टेटस बदलून तिनं ‘सिंगल’ असं टाकलं तेव्हा कळलं की तिनं माझ्याशी संबंध तोडून टाकलेत म्हणून! असं का, याचं स्पष्टीकरण देण्याची तिला आवश्यकताही वाटली नाही. कसला संवाद नाही, फोन घेणं नाही, की मेसेजला उत्तरं नाहीत. सोशल मीडियावर मला ‘ब्लॉक’ केलं. बोलायची इच्छा नाही, असं कळवून साधी भेटही दिली नाही. सध्याच्या ‘करोना’काळात तर संपर्क न साधण्याचं कारण तिला आयतंच गवसलं आहे. मी माझ्या आयुष्यात स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करतोय. सोनलसारख्या दगाबाज मुलीशी मला परत संबंध ठेवायचेही नाहीत. पण तरीही तिनं असं का केलं, हा प्रश्न माझा पिच्छा सोडत नाही.’’

नम्रता आणि केतनसारखे आपल्या सगळ्यांच्याच जीवनात कुठले ना कुठले कप्पे अर्धवट राहिलेले असतात. कितीतरी गोष्टींची उत्तरं अनिर्णीत राहिलेली असतात. कधी जिवाभावाच्या मत्रीचे धागे अचानक उसवले जातात, कधी एखाद्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे अनेक खुलासे अर्धवट राहतात, कधी आपल्याबद्दल विनाकारण ग्रह करून घेतले जातात, तर कधी इतरांच्या कठोर वागण्यानं मनावर ओरखडे उमटलेले असतात. या संबंधांची अखेर क्लेशकारक झालेली असते. चीड,  तिडिक, दु:ख , निराशा, अपेक्षाभंग यांसारख्या अनेक अस्वस्थकारक भावना मलमपट्टी न होताच मनाच्या तळाशी अर्धविरामात (‘अनफिनिश्ड बिझनेस’) साठून राहतात. ज्या व्यक्तींच्या संदर्भात या भावना उद्भवलेल्या असतात त्या व्यक्ती आपल्या जीवनातून बाजूला झालेल्या असतात, काही या जगात नसतात, किंवा असल्या तरी संवादाचे सर्व दरवाजे त्यांनी बंद करून घेतलेले असतात. त्यामुळे अर्धविरामातल्या भावनांची बोच आपल्याला जास्त खुपत राहते.

जसजसा अधिक काळ लोटत जातो, तसतशी या अस्वस्थतेची तीव्रता कधीकधी कमी होतेही. पण नेहमीच तसं घडत नाही. काळ किती लोटला आहे त्यापेक्षा आपण त्या काळात क्लेशकारक आठवणींना किती उजाळा दिला आहे, यावर ही तीव्रता अवलंबून असते. नम्रता व केतन घडलेल्या प्रसंगांची मनातल्या मनात अनेक वेळा उजळणी करतात किंवा इतरांना ते प्रसंग सांगत राहतात. त्यामुळे मनावरच्या जखमा भरण्याऐवजी त्यांच्यावरच्या खपल्या परत परत काढल्या जातात आणि अर्धविरामातल्या भावनांची तीव्रता कमी होण्याऐवजी वाढत जाते. नम्रताच्या आईचा मृत्यू होऊन तीन र्वष झाली, केतनच्या आयुष्यातून सोनल दूर होऊन सहा महिने झाले, तरी त्यांची अस्वस्थता अजून थांबली नाही, याचं कारण हेच आहे.

अर्धविरामातल्या भावनांना पूर्णविराम देण्यासाठी आपण का धडपडतो?.. याचं उत्तर आहे- आपल्याला असणारी निश्चितीची मानसिक गरज. परिस्थितीतली अनिश्चितता आपण थोडय़ाफार प्रमाणात स्वीकारतो. काही काळानंतर ती आपल्या अंगवळणीही पडते. उदाहरणार्थ- ‘करोना’मुळे उद्भवलेल्या अनिश्चिततेला तोंड द्यायला आपण बऱ्यापकी सरावलो आहोत. पण माणसांच्या वागण्यातली अनिश्चितता सहन करणं आपल्याला जड जातं. बाह्य़ परिस्थिती आपण फारशी नियंत्रित करू शकत नाही, परंतु माणसं स्वत:च्या वागण्याचं नियंत्रण करू शकत असल्यामुळे त्यांनी सुसंगत आणि निश्चिंत वागलं पाहिजे, असा आपला आग्रह असतो. त्यामुळं निश्चिंतीची गरज परिस्थितीपेक्षा माणसांच्या बाबतीत जास्त तीव्र असते.

‘क्रुगलॅन्स्की’ हा मानसशास्त्रज्ञ म्हणतो, की एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचं निश्चित कारण आपल्याला कळलं पाहिजे किंवा आपल्या समस्यांना निर्णायक उत्तरं मिळाली पाहिजेत, अशी आवश्यकता आपल्याला वाटत असते. निर्णायक उत्तरं किंवा निश्चित कारणं कळली, की आपल्या समस्यांचा शेवट होईल आणि अस्वस्थकारक भावना नाहीशा होतील, म्हणजेच त्यांना पूर्णविराम मिळेल अशी आपली समजूत असते. याला तो ‘पूर्णविरामाची गरज’(‘नीड फॉर क्लोजर’) असं  संबोधतो. नम्रता व केतनही निश्चित उत्तरं शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. केतनला वाटतंय, की जर सोनलनं तिच्या वागण्याचं पटेल असं स्पष्टीकरण दिलं, तर त्याच्या बेचनीला पूर्णविराम मिळेल. नम्रताला वाटतंय, की आईनं पक्षपाती असल्याचं  कबूल करून क्षमा मागितली असती तर तिच्याबद्दल कडवटपणा राहिला नसता.

‘पूर्णविरामाच्या गरजे’वर झालेलं अलीकडचं संशोधन सांगतं, की पूर्णविराम हे एक मिथक आहे. असा कुठला क्षण नसतो, की जेव्हा समस्यांना निर्णायक आणि कायमस्वरूपी पूर्णविराम मिळतो. ‘समस्या निराकरण’ हा एक प्रवास असतो. या प्रवासात अनेक भावना अर्धविरामात राहणं साहजिक आहे. किंबहुना भावनिक प्रवासाचा पुढला टप्पा गाठण्यासाठी ते आवश्यकही असतं. तसंच निश्चित उत्तरं मिळूनही प्रश्न सुटतात असं नाही. उलट अनेकदा त्यातून जास्त गुंतागुंत होऊ शकते किंवा नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात. समजा सोनलनं ‘मला दुसऱ्या मुलात रस निर्माण झाला आहे,’ असं ब्रेक-अपचं निश्चित कारण दिलं, तर केतनची बेचनी कमी होईल का? उलट ती अधिक वाढेल. किंवा मत्सर, फसवणूक अशा अस्वस्थकारक भावना त्याच्या मनात थमान घालतील. नम्रताच्या आईनं पक्षपाती असल्याचं कबूल केलं असतं तर नम्रताच्या मनातला कडवटपणा अजून वाढून त्याचं दुस्वासातही रूपांतर होऊ शकलं असतं.

थोडक्यात, निर्णायक उत्तरांच्या पाठीमागे न पळता अर्धविरामातल्या भावनांची तीव्रता कमी करणं नम्रता आणि केतनला जास्त फलदायी आहे. नम्रता आणि केतन दोघांनाही असं वाटतंय, की आई आणि सोनल यांनी स्वत:चं वागणं बदललं असतं तर त्यांची अस्वस्थता कमी झाली असती. म्हणजे स्वत:च्या अस्वस्थतेला ते त्यांना जबाबदार धरत आहेत. नम्रताची आई हयात नसल्यानं आणि सोनल केतनच्या जीवनातून दूर गेल्यामुळे त्यांच्या वागण्यातल्या बदलांवर नम्रता व केतनचं नियंत्रण नाही. त्याऐवजी त्यांनी हे नियंत्रण स्वत:कडे घेऊन स्वत:च्या विचारपद्धतीत बदल केला तर त्यांची अस्वस्थता कमी होऊ शकेल. त्यासाठी त्यांनी काय करायला हवं?

भयंकरीकरण थांबवणं – जीवनातल्या सर्व प्रश्नांना निश्चित उत्तरं मिळतीलच असं नाही. आपल्या जीवनातले काही कप्पे अपूर्ण राहतील, किंवा काही भावना अर्धविरामात राहतील व तसं असणं भयंकर नाही, हे नम्रता व केतननं स्वत:ला पटवून दिलं पाहिजे. भावनेचं भयंकरीकरण करून आपण तिची तीव्रता वाढवून ठेवतो. भयंकरीकरण थांबवलं तर अर्धविरामांसकट व अपूर्णतेसकटही आपण जीवन आनंदानं जगू शकतो हे ते अनुभवू शकतील. तसंच भूतकाळाचं ओझं न वाहता वर्तमानकाळातले क्षण आनंदानं जगू शकतील.

अपूर्णतेचा स्वीकार करणं – आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व माणसांच्या वागण्याला ठोस व निश्चित कारण असतंच असं नाही. तेही आपल्यासारखेच अपूर्ण असतात. त्यांच्याप्रमाणे आपणही कित्येक वेळा विसंगत व अनिश्चित वागत असतो,  किंवा आपलं वागणं इतरांना पक्षपाती अथवा संदर्भहीन वाटू शकतं. नम्रतानं आई व केतननं सोनल हे आपल्यासारखेच अपूर्ण आहेत, हे समजून घेतलं तर त्यांच्याकडे सहिष्णु दृष्टिकोनानं ते पाहू शकतील व त्यांची अस्वस्थता कमी होऊ शकेल.

शिक्के मारण्यापासून दूर राहणं – निर्णायक उत्तरं मिळाली नाहीत तर अनिश्चितता निर्माण होते. ती संपवण्यासाठी आपल्याला शेवट करण्याची घाई लागते, आणि त्यासाठी आपण सोपा मार्ग निवडतो. तो म्हणजे- त्या व्यक्तीवर शिक्का मारणं. उदाहरणार्थ- आई पक्षपाती आहे, किंवा सोनल दगाबाज  आहे, असे शिक्के नम्रता व केतन संबंधित व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर मारतात. हे शिक्के वास्तवातली सत्यासत्यता शोधून काढण्यात अडथळा आणतात. त्यामुळे आई खरंच पक्षपाती होती का, किंवा सोनल खरंच बेजबाबदार होती का, हे वस्तुनिष्ठपणे जाणून घेण्याचा प्रयत्न नम्रता व केतनला करता येणार नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक चांगल्या बाजूंकडेही अशा शिक्क्यांमुळे दुर्लक्ष होऊ शकतं.

विरुद्ध भूमिका घेणं – नम्रतानं जर ती नम्रता आहे हे विसरून काही काळापुरती आईची भूमिका घेतली, आणि तिच्या नजरेतून दोन्ही मुलींकडे पाहण्याचा प्रयत्न केला, तर काही प्रसंगांतली आईच्या वागण्यातली अपरिहार्यता लक्षात येऊन तिच्या  मनात आत्ता असलेला कडवटपणा कदाचित कमी होऊ शकेल. तसंच केतननंही सोनलची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला, आणि तिच्या नजरेतून त्यांच्या संबंधांकडे पाहिलं, तर ‘आमच्यात सगळं काही छान होतं,’ या त्यानं काढलेल्या  निष्कर्षांची दुसरी बाजूही त्याला कळू शकेल व बेचनीची तीव्रता कमी होऊ शकेल.

एवढं करूनही काही अर्धविराम तसेच राहतील, किंवा काही नवीन निर्माणही होतील, याची तयारी नम्रता आणि केतननं ठेवली तर ते त्यांना खुपणार नाहीत.  उलट कवयित्री शांता शेळके यांनी पुढील काव्यपंक्तीत म्हटल्याप्रमाणे ते त्यांचा समंजसपणे स्वीकार करतील.

‘संबंध तुटतानाही एक अर्थ आपल्यापुरता..

एक धागा..जपून ठेवावा खोल हृदयात

एखादे रणरणते तप्त वाळवंट तुडवताना

माथ्यावर आपल्यापुरती खासगी बरसात..’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 1:04 am

Web Title: human emotions physcroscope dd70Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)