human male monkey aggressiveness dd70 | आक्रमकता की साहचर्य?

0
109
Spread the love

अंजली चिपलकट्टी – [email protected]

माणसातले नर हे निसर्गत: आक्रमक आणि हिंसक असतात, त्यांची तशी अंत:प्रेरणाच असते, या गृहीतकांवर वर्षांनुवर्ष विश्वास ठेवत अनेकदा या वृत्तीचं समर्थनच के लं जातं. ‘करोना’मुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळातही पुरुषांमधला हा हिंसाचार मोठय़ा प्रमाणावर दिसून आला आहेच; पण खरंच ही आक्रमकता निसर्गत: आहे की परिस्थितीजन्य?  सुप्रसिद्ध अभ्यासक डॉ. रॉबर्ट सेपॉलस्की आणि लिसा शेर यांनी बबून माकडांचा अभ्यास के ला तेव्हा त्यांना त्यांच्यातली हिंसक आक्रमकता परिस्थितीवश असल्याचं लक्षात आले. कालांतरानं या टोळ्यांमध्ये साहचर्य, एकोपा निर्माण झाल्याचंही लक्षात आलं आणि ते घडलं होतं या माकडांच्या टोळीतील माद्यांमुळे. माणसांचे पूर्वज मानल्या गेलेल्या माकडांमध्ये दिसलेला हा बदल माणसांमधील आक्रमकतेचं गृहीतक बदलण्यासाठी उपयोगी ठरू शकतो का, यावर विचार करणं ही आजच्या काळाची गरज आहे.

माणूस ही अनेक सजीवांपैकी एक प्रजाती. सत्तर हजार वर्षांपूर्वी माणसाच्या जाणिवांना एक अनोखं वळण मिळालं. ते होतं बोधात्मक (‘कॉग्निटिव्ह’) क्रांतीचं. त्यातून निर्माण झालेल्या मानवी संस्कृतीविषयक जाणिवा या त्याआधीच्या जैविक उत्क्रांतीच्या तुलनेत खूप गुंतागुंतीच्या, वैशिष्टय़पूर्ण आणि  वेगवान आहेत. म्हणूनच या जाणिवा आणि त्यातून उगम पावणारी मानवी वर्तणूक यांचा अभ्यास अतिशय रोचक आहे. या वर्तणुकीचा एक महत्त्वाचा पैलू आहे माणसातली आक्रमकता आणि त्यातून येणारा  हिंसाचार. हा वैज्ञानिकांच्या आस्थेचा विषय आहेच, पण अखिल मानवजातीसाठीसुद्धा चिंतेचा विषय आहे. म्हणूनच काळाच्या ओघात त्यात झालेल्या बदलाचा अभ्यास होणं गरजेचं आहे.

याचं ताजं उदाहरण म्हणजे ‘करोना’मुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीमध्ये घरात स्थानबद्ध असताना कौटुंबिक हिंसाचारात लक्षणीय वाढ झाल्याचं जगभरात दिसून आलं. अर्थातच यात सर्वात जास्त बळी पडल्या त्या स्त्रिया आणि मुलं. याच्या मुळाशी असणाऱ्या पुरुषी वर्चस्ववादी वृत्तीला ‘नेहमीचंच’ म्हणून बाजूला न सारता मानवी वर्तणुकीचा, विशेषत: स्त्री-पुरुष यांचे नैसर्गिक स्वभावगुण आणि भवतालाच्या संगोपनातून येणारे स्वभावविशेष यांचा वैज्ञानिक, तौलनिक असा सखोल अभ्यास होतो आहे. त्याची दखल घेणं आवश्यक आहे. यातून काही अवैज्ञानिक धारणांचा निचरा होऊ शकतो. याच विषयावर झालेलं एक संशोधन समजून घेणं उपयुक्त ठरू शकेल. हे संशोधन आहे आपल्या पूर्वसुरींबाबतचं- म्हणजे मनुष्यप्राण्याशी साधम्र्य असणाऱ्या इतर प्राण्यांचं- अर्थात ‘प्रायमेट्स’चं.

मनुष्य हासुद्धा इतर प्राण्यांसारखाच एक प्राणी आहे आणि त्याला वैज्ञानिक परिभाषेत ‘होमो सेपियन’ म्हणतात हे आपल्याला माहीत आहे. या होमो सेपियन्सचा, म्हणजे आपलाच इतिहास रक्तरंजित आहे. याचं प्रमुख स्पष्टीकरण असं दिलं  जातं, की माणसातले नर हे निसर्गत: आक्रमक आणि हिंसक असतात, त्यांची तशी अंत:प्रेरणाच असते. नंतर होणाऱ्या बाह्य़ वातावरणातल्या प्रभावांमुळे त्यात बदल होऊन आक्रमकता कमी झालीये; पण ही प्रवृत्ती नैसर्गिक असल्यानं ती बदलणं फार अवघड आहे, असा युक्तिवाद करून पुरुषी दमनाचं एका प्रकारे थेट समर्थन नसलं तरी अपरिहार्यता आपल्या समाजातले काही जण, अगदी स्त्रियाही, स्वीकारताना दिसतात. शिवाय पुरुषांनी ‘मर्दानी’ असलं पाहिजे आणि आक्रमक असलं पाहिजे, असा समज आणि मागणीही आपल्या समाजात दिसते. पुरुषी आक्रमकता आणि हिंसकपणा नैसर्गिक आहे. यासाठी पुरावे म्हणून ‘आपले पूर्वज पहा बरं, ते असेच आक्रमक होते. शिवाय उत्क्रांतीतले आपले जवळचे नातेवाईक चिंपांझी आणि बबून माकडं पहा.  या जातीसुद्धा नैसर्गिकपणे जगताना आक्रमक आहेतच ना,’ हे दिलं जाणारं स्पष्टीकरण वैज्ञानिक आहे असंच वाटतं; पण ते तसं नाही. ही आक्रमक आणि हिंसक वर्तणूक नैसर्गिक प्रेरणेपेक्षा ‘संस्कारा’तून अधिक फोफावली आहे, याचा सज्जड पुरावा काही वर्षांपूर्वीच्या अभ्यासातून मिळाला आहे. स्थळ- सेरेंगटी प्रदेश, आफ्रिका खंड. बबून या ‘प्रायमेट’चं वसतिस्थान. १९८३ च्या सुमारास डॉ. रॉबर्ट सेपॉलस्की आणि लिसा शेर हे दोघं येथे बबून्सचा अभ्यास करायला आले होते. रॉबर्ट सेपॉलस्की हे १९७८ पासूनच केनियातल्या ‘ऑलिव्ह बबून्स’ या जातीच्या प्रायमेट्सचा अभ्यास करत होते. ते स्टॅनफर्ड विद्यापीठात संशोधन आणि अध्यापन करतात. जंगलातल्या या प्राण्यांमध्ये मानसिक ताणाचं प्रमाण खूप असण्यामागची कारणं शोधणं हा त्यांच्या अभ्यासाचा मूळ उद्देश होता.

बबून्स हे ५० ते १०० च्या टोळ्यांमध्ये एकत्र राहतात आणि टोळ्यांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी त्यातले काही नर अतिशय आक्रमक वर्तन करतात. संगनमतानं हल्ला करणं, प्रसंगी बलवान शत्रू पाहून फितूर होणं आणि क्रूरपणे हिंसा करणं हे सामाजिक वर्तन अगदी खुनशी राजकारण्यासारखंच असतं. यांना तीक्ष्ण सुळेही असतात. त्यामुळे सिंहदेखील यांच्या शिकारीच्या फंदात पडत नाही. आश्चर्य म्हणजे हे बबून्स सर्वात जास्त बळी पडतात ते स्वत:च्याच हिंसेला! आपापसात टोळीअंतर्गत किंवा दोन टोळ्यांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात ते स्वत:च्याच जातबंधूंचा संहार करतात. (ओळखीचं वाटतंय ना!). या बबून्सना स्वत:चं अन्न-पाणी मिळवायला दिवसातले जास्तीत जास्त तीन-चार तास खर्च करावे लागतात. मग मोकळ्या वेळेत करायचं काय, तर ते एकमेकांवर हल्ले करतात. आक्रमक नर बबून्स तुलनेनं कमी आक्रमक नरांवर आणि माद्यांवर सतत दादागिरी करत त्यांना धाकात ठेवतात आणि ते धाकात राहिल्यानं टोळीत शांतता नांदते. पण त्यामुळे बबून्सच्या टोळ्या सतत ताणानं आणि चिंतेनं ग्रासलेल्या असतात, असं त्यांच्या अभ्यासातून दिसून आलं.

याच अभ्यासाच्या पुढच्या टप्प्यात १९८३ ते ८६ या काळात सेरेंगटीमध्ये वेगळंच काही तरी घडलं. रॉबर्ट आणि लिसाच्या चमूनं अभ्यास करण्यासाठी एका टोळीची निवड केली होती. तिला आपण ‘टोळी क्र. १’ असं म्हणू. या टोळीमधले नर, मादी आणि पिल्लं यांचं परस्परांशी असलेलं नातं, त्यांचं वर्तन, अन्न गोळा करण्याचा तऱ्हा या सगळ्याचं निरीक्षण करणं चालू होतं. तिथून काही किलोमीटर अंतरावर एक पर्यटन केंद्र होतं. जंगलातल्या पर्यटन केंद्रानं काही नियमांचं पालन करणं अतिशय आवश्यक असतं.  विशेषत: जंगली प्राण्यांना बाहेरचं अन्न खायला न देण्याबाबत अतिशय दक्ष असणं आवश्यक असतं. येथे मात्र बरोबर त्याच्या उलट घडत होतं. उरलेसुरले खाण्याचे पदार्थ, मांस हे तिथल्या उघडय़ा कचरापेटीत टाकलं जात होतं. ते खाण्यासाठी पर्यटन केंद्राजवळच्या टोळीतल्या (या टोळीला म्हणू या- ‘टोळी क्र. २’) बबून्सची झुंबड उडत असे. ही बबून माकडं इतकी हुशार (आपले पूर्वजच ते!) की त्यांनी अन्न कचरापेटीत टाकण्याची वेळ हेरून ठेवली होती. बरोबर त्या वेळी ती आजूबाजूच्या झाडांवर दबा धरून बसत आणि कचरा टाकायला गाडी आली की तीरासारखी उडय़ा मारून त्यावर तुटून पडत. अर्थातच त्यांच्यापैकी जे जास्त आक्रमक होते त्यांचाच निभाव लागत असे. मारामारी करत दुसऱ्याला हुसकून लावतच आक्रमक नर बबून्स त्या अन्नावर तुटून पडत. अनेक नर बबून्स यात जखमी होत. माद्या आणि पिल्लं तर त्याजवळ फिरकतही नसत. कष्ट न करता मिळणाऱ्या या अन्नामुळे त्या टोळीतले बरेच नर हे पोट सुटलेले, स्थूल आणि उपद्रवी बनले होते. हे घडत होतं ‘टोळी क्र. २’मध्ये.

रॉबर्ट आणि लिसाला थोडय़ाच दिवसांत असं लक्षात आलं, की हे पर्यटन केंद्र ते अभ्यास करत होते ते त्या ‘टोळी क्र. १’च्या परिसरापासून लांब असूनसुद्धा त्यातल्या बबून्सना या दूरवरच्या फुकट मिळणाऱ्या अन्नाचा सुगावा लागला होता. सकाळच्या वेळी जेव्हा ‘टोळी क्र. १’मधले सर्व जण एकत्र असण्याचा काळ असायचा, त्या वेळेला काही नर टोळीतून गायब असत आणि ते आयतं अन्न मिळवण्यासाठी लांब पर्यटन केंद्राजवळ जात. अर्थातच अशा प्रकारे हुंबपणा करू  शकणारे बबून्स आक्रमक होते; पण घडलं असं, की त्यानंतर काही महिन्यांतच असं अन्न खाणाऱ्या जवळजवळ सर्व नरांना क्षयरोगाची लागण झाली. म्हणता म्हणता त्यात ते बळी पडले. बाधा त्या अन्नातूनच झाली होती. थोडा शोध घेतल्यावर असं लक्षात आलं की पर्यटन केंद्रात येणारं गाईचं मांस क्षयरोगानं बाधित होतं, तरीही अन्न निरोगी असल्याची तपासणी करणाऱ्या तिथल्या निरीक्षकानं पैश्यांच्या लोभानं अशा बाधित गाईच्या मांसाला केंद्रात येऊ दिलं. त्यातलं खाण्यायोग्य मांस शिजवण्यासाठी वापरून उरलेले अवयव त्यातल्या क्षयरोगानं बाधित असलेल्या फुप्फुसांसकट कचरापेटीत फेकलं होतं. त्यामुळे ‘टोळी क्र. १’मधले अनेक नरही त्याला बळी पडले आणि टोळीतल्या माद्यांची संख्या नरांच्या तुलनेत दुप्पट झाली. काही महिन्यांत त्यांना टोळीत अनेक बदल दिसू लागले. टोळीत आता कमी आक्रमक असलेले नर होते. टोळीतले सर्व जण आता एकमेकांशी जास्त मिळून-मिसळून वागत होते. पिल्लंही नर बबून्सच्या जवळ सहज वावरताना दिसू लागली, जे एरवी फार दुर्मीळ होतं. नर बबून्स तर चक्क एकमेकांच्या वाढीत मदत करताना दिसू लागले. त्यांचं माद्यांशी वागणंही बदललं होतं. हे संशोधकांच्या आधीच्या समजेपेक्षा वेगळं होतं. त्यानंतर रॉबर्ट-लिसाचा चमू दुसऱ्या काही टोळ्यांच्या अभ्यासात गुंतला.

दहा वर्षांनंतर त्याच जंगलात अभ्यास चालू असताना पुन्हा ही ‘टोळी क्र. १’ त्यांच्या पाहण्यात आली आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. पूर्वी त्यांनी या टोळीत पाहिलेला बदल तात्पुरता असेल असं त्यांना वाटलं होतं; पण अजूनही या टोळीत पूर्वीसारखंच साहचर्य टिकून होतं. टोळीत आक्रमकता नव्हती. म्हणजे संशोधकांचा जो पक्का समज होता- की बबून माकडांमध्ये आक्रमकता नैसर्गिक अंत:प्रेरणेमुळे असते, ते खोटं ठरलं होतं.  गंमत म्हणजे दहा वर्षांपूर्वी टोळीत असलेले कोणतेच नर आता टोळीत नव्हते. कारण बबून्समध्ये वयात येणारे सर्व नर टोळी सोडून दुसऱ्या टोळीत जातात. म्हणजे या टोळीतले जवळजवळ सर्व नर बाहेरून टोळीत नव्यानं सामील झालेले असणार. ते सर्व जण बाहेरच्या इतर टोळ्यांमध्ये वाढलेले असणार. आक्रमकता ही अंत:प्रेरणा असेल तर ती त्यांपैकी काही जणांमध्ये तरी दिसायला हवी होती. शिवाय त्यांनी त्यांच्या टोळीतही अशीच आक्रमकता अनुभवली असणार. मग तरीही त्यांचं वर्तन आक्रमक नसणं हा योगायोग नक्कीच नव्हता. त्याला तसंच काही तरी प्रबळ कारण असलं पाहिजे. याचं उत्तर मिळवण्यासाठी या चमूनं थोडं अधिक निरीक्षण करायचं ठरवलं.

त्यांना असं लक्षात आलं, की आक्रमक नसण्याचं वर्तन या टोळीत आल्यावर ते ‘शिकले’ होते.  टोळीत बाहेरून आल्यावर त्यांनी आक्रमक होण्याचा प्रयत्न केला असणार. तेव्हा ‘येथे असं वागणं चालत नाही..’ असं त्यांना ‘शिकवलं’ गेलं होतं. हे संस्करण त्यांच्यावर कसं आणि कुणी केलं होतं, या प्रश्नाच्या स्पष्टीकरणाच्या अनेक शक्यता होत्या; पण निरीक्षणातून एक शक्यता सर्वात प्रबळ होती, ती म्हणजे टोळीतल्या माद्यांनी बजावलेली भूमिका!  त्यांनी निवड करताना आक्रमक नसलेल्या नराला अधिक पसंती दिली होती या शक्यतेला पुष्टी मिळेल अशी निरीक्षणं त्यांना मिळाली. आपल्या कोणत्या वर्तणुकीचे स्वत:ला जास्तीत जास्त फायदे होतात, ‘रिवॉर्डस’ मिळतात, हे नरांनी ओळखलं होतं. मादी मिळवण्याची धडपड करताना आक्रमक असण्यापेक्षा सौहाद्र्यानं वागणं अधिक उपयुक्त ठरत होतं. त्याचं अनुकरण मग नवीन आलेले नरही करत होते. चांगली गोष्ट म्हणजे टोळीचं आरोग्य आणि टोळीची लोकसंख्या या बाबतीतसुद्धा ही टोळी इतरांपेक्षा अधिक सरस होती. तर ही झाली मानवाशी सगळ्यात जवळचं नातं सांगणाऱ्या बबून माकडांची कथा!

ही काल्पनिक कथा नसून सत्यकथा असल्यानं आपल्यासमोर अनेक प्रश्न उभे ठाकतात. बबून्स आणि माणसाच्या वर्तनात अनेक साम्यस्थळं आहेत. यामुळे माणसातील सांस्कृतिक उत्क्रांतीची गुंतागुंत समजून घ्यायला मदत होऊ शकते. मानवी संस्कृतींमध्ये आक्रमकता आणि साहचर्य एकाच वेळी तितक्याच प्रबळपणे वास करतात. अनेक मानवी समूह सौहार्दानं राहताना दिसतात, आक्रमक न होता साहचर्यानं राहण्याचं शहाणपण दाखवतात. पण तरीही हे सार्वत्रिक नाही. काही अंशी हे वरकरणी दिसणारं साहचर्य आणि शांतता दुसऱ्याला धाकात ठेवून वर्चस्व स्थापन करण्याच्या वृत्ती आणि कृतीतून तर आली नाही ना, याचा विचार करणं आवश्यक आहे. माणसातली आक्रमकता आणि हिंसा एका वेगळ्याच सफाईदार पातळीवर पोचलेली दिसते आहे. हिंसा स्वत: न करता राष्ट्रहिताच्या नावानं युद्धं घडवणं, समाजमन पेटवून दंगली घडवणं, जंगलांच्या कत्तली करणं, इथपासून जन्मत: मिळणाऱ्या पुरुषी वर्चस्वाचे फायदे घेत घरात स्त्रियांना धाकात ठेवणं, दुय्यम वागणूक देणं, ही याच हिंसक आणि आक्रमक वृत्तीची वेगळी रूपं आहेत. समाजात अनेक पुरुषच नव्हे, तर स्त्रियाही या आक्रमकतेचं समर्थन करताना दिसतात. ‘ही मॅन’ आणि ‘मर्दासारखं’ वागणं कसं भारी, असे संस्कार चित्रपटांमधूनही सहजपणे होताना दिसतात. अगदी जोडीदार निवडतानाही पुरुषानं समजूतदार असण्यापेक्षा कसं ‘राकट’ असावं, अशीही अपेक्षा काही स्त्रिया व्यक्त करतात. आक्रमक होताना नेमकं बळी पडू शकणारा (‘व्हल्नरेबल’) कोण आहे, हे हेरून बरोबर त्यानुसार अशा लोकांवर वर्चस्व गाजवत त्यांना नागवणं, असं पुरुष आणि स्त्रिया दोघंही करताना दिसतात. हा तर आक्रमकता ही संस्कारित असल्याचा सबळ पुरावाच आहे.

माणसानं आक्रमकतेच्या सांस्कृतिक उत्क्रांतीची अशी चढती पायरी गाठली नाही ना, अशी शंका घ्यायला इथे बराच वाव आहे. परंतु जैविक उत्क्रांतीतून मिळालेली ती एक अपरिहार्य अंत:प्रेरणा नसून आपल्या निवडीतून ती आपण बदलू शकतो हा केवढा मोठा दिलासा आहे! बबून्सप्रमाणेच माणसालाही मूलभूत गरज भागवण्यासाठी फार वेळ घालवावा लागत नाही. या रिकाम्या वेळेचा सदुपयोग कसा करावा, यात माणसानं  आपले ‘जादाचं शहाणपण’ वापरणं हे ‘माणुसकी’ला जागल्याचं लक्षण ठरेल.

‘वर्चस्व गाजवण्याची वृत्ती ही उत्क्रांतीनंच आम्हाला दिलेली भूमिका आहे,’ असा युक्तिवाद वैज्ञानिक नाही, हे यानिमित्तानं लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. ज्या जैविक, भौतिक आणि सामाजिक पर्यावरणातल्या बदलांना प्रतिसाद म्हणून उत्क्रांतीची प्रक्रिया घडत असते, ते पर्यावरणसुद्धा स्वत:च्या बुद्धीनं बदलण्याची माणसासारखी ताकद आणि लवचीकता अन्य प्राण्यांत नाही. आपल्या चुकीच्या वर्तनाला आनुवंशिकतेचा आधार शोधण्यापेक्षा हा लवचीकतेचा आणि साहचर्याचा वारसा पुढच्या पिढीला सोपवणं हे मानवजातीला तारणारं ठरेल.

(लेखिका विज्ञान अभ्यासक असून विज्ञान, विवेकवादी व चिकित्सक विचार प्रक्रियेसाठी संवादक आणि  प्रसारक म्हणून काम करीत आहेत)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 1:16 am

Web Title: human male monkey aggressiveness dd70Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)