If the rules break we will file case nmc chief tukaram Mundhe zws 70 | नियम मोडले तर गुन्हा दाखल करू!

0
58
Spread the love

आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा

नागपूर : करोनाच्या परिस्थितीवर नियंत्रणासाठी सोमवारपासून महापालिका आणि पोलीस प्रशासन अधिक दक्ष होणार आहे. कुणी नियम मोडताना आढळून आल्यास नागरिकांनी महापालिका आणि पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी. अशा नियम मोडणाऱ्या व्यक्ती, संस्था, खासगी कार्यालये आदींवर कठोर कारवाई करण्यात येईल. प्रसंगी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

आज शनिवारी  मुंढे यांनी चित्रफितीद्वारे नागरिकांशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी करोनासंदर्भात नागपुरातील परिस्थितीवर भाष्य केले. नागपुरात करोनाचा पहिला रुग्ण ११ मार्च रोजी आढळला होता. आज ११ जुलै आहे. चार महिन्यात रुग्णांची संख्या १७८९ इतकी आहे. मात्र, ही संख्या गेल्या दीड महिन्यात झपाटय़ाने वाढली. राज्य शासनाने १ जूनपासून टाळेबंदीमध्ये  शिथिलता दिली. यादरम्यान आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडूच नये असे आवाहन करण्यात आले होते. मात्र शहरात महापालिकेने दिलेल्या दिशानिर्देशांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे. खासगी किंवा शासकीय कार्यालयात १५ व्यक्ती किंवा १५ टक्के यापेक्षा जी संख्या अधिक असेल त्या संख्येत कर्मचाऱ्यांना बोलावून काम करण्याची मुभा देण्यात आली होती. परंतु त्याचेही उल्लंघन होत आहे. दुकाने सुरू करण्यासंदर्भातील काही नियम आहेत. बाजार परिसरातील दुकाने एका बाजूची एक दिवस आणि दुसऱ्या बाजूची दुसऱ्या दिवशी उघडावी, तसे दिवस ठरवून देण्यात आले आहेत मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी सामाजिक अंतर ठेवत मुखपट्टीचा वापर करावा अशा सूचना दिल्या होत्या मात्र त्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. अनेक जण विनाकारण शहरात फिरतात. परिणामी शहरात करोना बाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली, नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर आणखी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, याकडेही आयुक्तांनी लक्ष वेधले.

कारागृहात सुमारे ३०० कैदी करोनाग्रस्त

मध्यवर्ती कारागृहातील ५०० कैद्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी सुमारे ३०० कैदी करोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. अजून सुमारे १२०० जणांची चाचणी व्हायची आहे. त्यातून मोठा आकडा समोर येण्याची शक्यता आहे. एकंदरच मध्यवर्ती कारागृह आता करोनाचा नवा ‘हॉटस्पॉट’ झाला आहे. असे हॉटस्पॉट शहरात इतरत्र तयार होऊ  नये, असे वाटत असेल तर करोनाची साखळी खंडित करण्यासाठी दिशानिर्देशांचे पालन करा, असे आवाहन मुंढे यांनी केले आहे.

महापालिकेत एकत्र येत आयुक्त मुंढे यांना पाठिंबा

महापालिकेत शुक्रवारी  स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपपमेंट कार्पोरेशन लि. या कंपनीच्या मुख्य कार्यकारी पदावर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना डावलून सहायक आयुक्त महेश मोरोने यांची नियुक्ती करण्यात आली. या पाश्र्वभूमीवर आज शनिवारी सकाळी मुंढे समर्थक महापालिकामध्ये एकत्र आले व त्यांनी आयुक्तांना पाठिंबा जाहीर केला.  सत्ताधारी भाजपने  मुंढे यांच्या कार्यशैलीच्या विरोधात मोहीम सुरू केली आणि न्यायालयात त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. यामुळे मुंढे समर्थकांनी एकत्र येऊन त्यांना पाठिंबा देणे सुरू केले आहे. या क्रमात आज शनिवारी महापालिकेत शेकडो मुंढे समर्थक गुलाबाचे फूल घेऊन  दाखल झाले. त्यांनी आयुक्तांना बाहेर येण्याची विनंती केली. मात्र आयुक्त बाहेर आले नाही. शेवटी समर्थकांमधील चार लोक त्यांच्या कक्षात गेले आणि नागपुरात करोनावर नियंत्रण मिळविण्यात आयुक्तांनी चांगले काम केल्यामुळे त्यांचे स्वागत केले. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, असे आश्वासन यावेळी मुंढे यांच्या समर्थकांनी त्यांना दिले. नगरसेवक कमलेश चौधरी यांच्या नेतृत्वात हे मुंढे समर्थक एकत्र आले होते.

आयुक्तांनी आठमुठेपणा सोडून रस्ता कामे सुरू करावी – खोपडे

बिडगांव टी—पाईंट चांदमारी रोड ते वाठोडा घाट आणि संघर्षनगर ते क्षेपण भूमी (डम्पिंग यार्ड) समोरील रस्त्याचे कार्यादेश होऊन सुद्धा महापालिका  आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या तोंडी आदेशामुळे काम बंद करण्यात आले. या रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय असून नागरिक जनप्रतिनिधींवर रोष व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आयुक्तांनी आडमुठेपणा सोडून  या रस्त्याची कामे तातडीने सुरू करावी, अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे. पूर्व नागपुरातील अनेक विकास कामांचे कार्यादेश झाले.  सर्व प्रशासकीय मान्यता घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तीन कामांचे प्रस्ताव प्रधान सचिव, नगर विकास विभाग यांना पाठविले होते. शासनाने ९.७४ कोटी लेखाशीर्षांमधून दिले. शासनाच्या आदेशावर जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून व विभागीय आयुक्त यांच्या समितीची मान्यता घेत कारवाईचे आदेश दिले. मात्र त्यानंतरही काम सुरू करण्यात आले नाही, याकडे खोपडे यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 6:12 am

Web Title: if the rules break we will file case nmc chief tukaram mundhe zws 70Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)