Konkan Ganeshotsav: Konkan Ganeshotsav: गणपतीला गावी जाण्यासाठी नियमांचे विघ्न; ‘हे’ आहेत कळीचे सवाल – government’s plan to stop people going to konkan for ganeshotsav says ashish shelar

0
23
Spread the love

मुंबई: ‘गणपतीला गावी यायचे असेल तर ७ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोहचावे लागेल. त्यानंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही’, असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी घेतलेल्या बैठकीच्या इतिवृत्तात नमूद करण्यात आल्याने त्यावरून मुंबई, ठाण्यातील तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या इतिवृत्ताचे राजकीय पडसादही उमटू लागले असून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ( Konkan Ganeshotsav )

वाचा: गणपतीला गावी जायचंय; ७ ऑगस्टनंतर सिंधुदुर्गात प्रवेश नाही?

गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे या जिल्ह्यांतून कोकणात प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाखो चाकरमानी गावी जातात. यंदा करोनामुळे या चाकरमान्यांच्या वाटेत मोठे विघ्न उभे ठाकले आहे. आपल्याला गणपतीला गावी जाता येणार का, याबाबत सर्वांच्याच मनात चलबिचल आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या एका बैठकीने व या बैठकीत ठरलेल्या नियमावलीने अनेक प्रश्न उपस्थित झाले.

गणेशोत्सव यंदा २२ ऑगस्टपासून सुरू होत आहे. करोनाची साथ लक्षात घेता गणेशोत्सवाला परजिल्ह्यातून सिंधुदुर्गात यायचे असेल तर ७ ऑगस्टच्या मध्यरात्रीआधी पोहचावे लागेल. ई-पास नसेल तर प्रवेश दिला जाणार नाही, असे अनेक जाचक नियम या बैठकीत ठरवण्यात आले. यावरून वादळ उठताच जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने स्पष्टीकरण देत हे बैठकीचं इतिवृत्त आहे, हा आदेश नाही. याबाबत आणखी एक बैठक होईल. त्यानंतर शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाईल. त्यानंतरच अंतिम निर्णय होईल, अशी सारवासारव जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केली. त्यावर भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

वाचा: गणपतीला चाकरमानी येणार!; सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणाले

‘लालबागच्या राजाची आणि भक्तांची ताटातूट करू नका, तसेच कोकणातील चाकरमान्यांची आणि बाप्पाची भेट कशी होणार? याची आम्ही सरकारकडे विचारणा केली होती. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना पुढे करुन चाकरमान्यांची कोंडी करण्याचा प्लॅन तयार केला? परस्पर घोषणा केली? सरकारला हे मान्य ?’ असं ट्विट करत या संपूर्ण गोंधळावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

मुंबईस्थित कोकण सेवा संस्थेचे सरचिटणीस मनोज राणे यांनीही सरकारला याअनुशंगाने प्रश्न विचारले आहेत. ते असे…

१. चाकरमान्याकडे ई-पास असेल तरच त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार आहे. तेव्हा मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे या ठिकाणांहून गणपती उत्सवाला जाण्यासाठी चाकरमान्यांनी अर्ज केल्यापासून किती दिवसांत ई-पास मिळणार हे जाहीर करावे.

२. जर गणेशभक्त ७ ऑगस्ट रोजी दुपारी परजिल्ह्यातून (मुंबई/ठाणे/पुणे/पालघर) निघाले आणि ट्रॅफिकमुळे किंवा काही कारणास्तव सिंधुदुर्गमध्ये पोहचण्यास रात्री उशीर झाला तर त्यांना माघारी पाठवले जाणार का?

३. परजिल्ह्यातून गेल्यानंतर १४ दिवस विलगीकरणात असताना गणेशभक्तांची तब्बेत खालावली तर त्यावर शासनाने कोणती उपाययोजना आखली आहे.

४. लॉकडाऊन काळात परप्रांतीयाना त्यांच्या मूळगावी शासनाच्या वतीने मोफत पाठवण्यात आले. आता लॉकडाऊन काही अंशी शिथील झाल्यानंतर अनेक परप्रांतीय मजूर परत येत आहेत. त्यांचा ई-पास तपासण्यात आला का आणि तपासणीअंती पास नसल्याचे आढळल्यास त्यांच्याकडून आतापर्यंत किती दंड वसूल करण्यात आला?

५. राजकीय पक्ष,लोकप्रतिनिधी यांनी गणेशभक्तांकरिता विशेष बसची व्यवस्था करू नये, असे नियमावलीत नमूद केले आहे याचा अर्थ आपण शासनस्तरावर याची मोफत व्यवस्था जशी परप्रांतीय मजुरांसाठी केली होती तशी आपल्या गणेशभक्तांसाठी करणार आहात का?

वाचा: करोना आजारावर आयुर्वेदिक उपचार! भारत-अमेरिकेत चाचणी होणार

ग्रामपंचायतींचे जाचक ठराव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनीही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठराव केले आहेत. चाकरमान्यांनी गणपतीसाठी ५ ऑगस्टपूर्वीच गावात यावे, असा ठराव वैभववाडीतील तिथवली ग्रामपंचायतीने केला आहे तर सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली ग्रामपंचायतीने चाकरमान्यांना २ ऑगस्टची डेडलाइन ठरवली आहे. याप्रकारे आणखीही काही ग्रामपंचायतींत ठराव झाले आहेत. या ठरावांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा कोणताही अंतिम आदेश वा निर्णय नसताना ग्रामपंचायती परस्पर असे ठराव कसे मंजूर करू शकतात?, असा प्रश्न विचारला जात आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीचं इतिवृत्त असं…

– परजिल्ह्यांतून सिंधुदुर्गात येणाऱ्या गणेशभक्तांना ७ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंतच प्रवेश देण्यात येईल.
– गृह विलगीकरणाचे नियम मोडणे, ई-पासशिवाय जिल्ह्यात प्रवेश करणे इत्यादी कारणांसाठी ५ हजार रुपये दंड.
– गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करू नये. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच खरेदी उरकावी.
– जिल्ह्यात ३२ सार्वजनिक गणपती असून गणपतीची उंची यंदा कमी ठेवण्यात यावी तसेच बाकी मोठे कार्यक्रम, मिरवणुका करू नयेत.
– गणेशोत्सवात गावात वाडीवाडी मध्ये एकत्र येऊन भजन, आरती न करता घरातील सदस्यांनीच भजन व आरती करावी. सत्यनारायण महापूजा, डबलबारी भजनांचे आयोजन करण्यात येऊ नये. यावर गाव नियंत्रण समितीने लक्ष ठेवावे.
– गणपती विसर्जनावेळी एका गणपतीसोबत कुटुंबातील २ सदस्यांनीच उपस्थित राहावे. विसर्जनावेळी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करावे. विसर्जन मिरवणुका टाळाव्यात. यावरही गाव समितीचे लक्ष असणे आवश्यक आहे.
– गणेशोत्सवादरम्यान एकमेकांच्या घरी गणपती दर्शनासाठी जाऊ नये.
– गणेश विसर्जनादिवशी सिंधुदुर्गात दुपारचं जेवण अर्थात म्हामंद प्रथा आहे. ते यंदा घरातील लोकांनीच करावे. अन्य कुणाला घरी बोलावू नये.
– राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी यांनी गणेशभक्तांसाठी विशेष बसव्यवस्था करू नये.
– बाहेरून जिल्ह्यातील गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ग्रामस्तरीय समितीकडे नोंद असणे आवशयक आहे. या प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी केली जावी.
– गणपतीची पूजा स्वत:च करावी. पुरोहितामार्फत पूजा करण्यासाठी ऑलनाइन पूजेचा पर्याय निवडावा.

वाचा: होय हे शक्य आहे; १०० वर्षांच्या आजोबांनी करोनाला हरवलं!

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)