lila patil madam srujan anand vidyalay dd70 | ‘प्रजासत्ताकाची मशागत’

0
31
Spread the love

समीर शिपूरकर  – [email protected]

आनंददायी, सर्जनशील, बालककेंद्री  शिक्षण ही एक गंभीर सामाजिक, राजकीय कृती आहे, असं आयुष्यभर मानत त्याच दृष्टीनं शिक्षणाकडे पाहाणाऱ्या  लीला पाटील यांचं नुकतंच निधन झालं.  कोल्हापूरमध्ये त्यांनी ‘सृजन आनंद विद्यालय’ सुरू केलं आणि वयाच्या ८२-८३ वर्षांपर्यंत त्या शाळेत सक्रिय सहभाग दिला.  ही मुलं आणि बाहेरचा समाज हे एकमेकांचे अविभाज्य भाग होते.  मुलांना समाजात जे काही घडतं त्यांची माहिती असली पाहिजे यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक अनेक गोष्टी के ल्या होत्या. लीलाताईंच्याच शब्दांत सांगायचं तर,  ही सगळी ‘प्रजासत्ताकाची मशागत’ विद्यालयात सतत चालू असते. उद्याच्या गुरुपौर्णिमेनिमित्तानं अनेकांच्या गुरुस्थानी असणाऱ्या प्राचार्य लीला पाटील यांना आदरांजली.

लीलाताई १५ जूनला निवर्तल्या. त्यांच्याविषयी लगेच काही लिहिणं मुद्दामच टाळलं, कारण लीलाताईंचे त्यांनी न उच्चारलेले शब्द माझ्या कानात स्पष्ट ऐकू आले, ‘‘काय समीर, इतकी काय घाई होती लेख लिहायची? जरा मुरू द्यावं ना! जगणं जसं मुरावं लागतं तसं मरणंही मुरावं लागतं आणि इतक्या पटपट सुचतं तरी कसं तुम्हाला? की लेख आधीच तयार ठेवला होता? नाही, माझ्या मनात नुसतं येऊन गेलं बरं का!’’ लीलाताईंना जे लोक प्रत्यक्ष ओळखतात त्यांना लीलाताईंचा ठसकेबाज ‘टोन’सुद्धा ऐकू आला असेल.

लीलाताई होत्याच तशा. स्पष्ट बोलणाऱ्या, फटकळ, तिरका विनोद करणाऱ्या, त्यांचा दरारा वाटावा अशा. त्या करारीपणाच्या पल्याड जे पोहोचू शकायचे त्यांना लीलाताईंचा प्रेमळपणा अनुभवता यायचा.  प्राचार्य लीलाताई पाटील. कोल्हापूरच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयात त्या प्राचार्य होत्या. भारतीय शिक्षणव्यवस्थेच्या गाभ्यातले दोष आणि उणिवा कोणत्या आहेत याची त्यांना स्पष्टता होती. शिवाय शासकीय यंत्रणेत उभं आयुष्य घालवल्यानं प्रशासकीय  व्यवस्थेतल्या अनेक खाचाखोचा त्यांना माहीत होत्या. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी कोल्हापुरात ‘सृजन आनंद विद्यालय’ सुरू केलं आणि वयाच्या ८२-८३ वर्षांंपर्यंत त्या शाळेत सक्रिय सहभाग दिला.

लीलाताई शिक्षणाच्या क्षेत्रात असल्या तरी ठाम राजकीय भूमिका घेणाऱ्या होत्या. भोंगळ, पलायनवादी नव्हत्या. राजकीय भूमिका म्हणजे पक्षीय भूमिका नव्हे. कोणत्याही घटनेला राजकीय, सामाजिक परिमाण असतं, कोणतीही घटना अंतराळात, अधांतरी घडत  नसते, हा त्यांचा विश्वास होता. त्यामुळे एखाद्या घडामोडीला, कृतीला थेट पाठिंबा देण्याचं किंवा थेट विरोध करण्याचं धारिष्टय़ त्यांच्यामध्ये होतं. ‘शिक्षण हे अतिशय पवित्र क्षेत्र आहे आणि त्याचं बेट बनवून ते समाजापासून दूर ठेवायचं असतं’ असं मानणाऱ्यांपैकी त्या नव्हत्या. खऱ्या लोकशाहीवादी नागरिकाला सतत जागं राहावं लागतं आणि त्या जागरणाची सुरुवात प्राथमिक शिक्षणापासून झाली पाहिजे, असं त्यांचं मत होतं. तोच प्रयत्न त्या ‘सृजन आनंद’मध्ये करत होत्या. मुलांना विश्लेषणात्मक आणि मूल्यमापनात्मक विचार करण्याची अर्थात ‘क्रिटिकल थिंकिंग’ची सवय याच वयापासून लागली पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. लोकशाहीला अनुकूल असलेले नागरिक घडवणं, हा उद्देश असलेली ही शाळा म्हणजे प्रश्न विचारणाऱ्या आणि उत्तरं शोधणाऱ्या मुलांची जडणघडण करणारं एक जिवंत केंद्र होतं; अजूनही आहे.

व्यक्ती कितीही मोठी वा मोठय़ा पदावरची असली तरी लीलाताई न पटणाऱ्या गोष्टी त्यांना ठामपणे सांगत. महाराष्ट्राचे एक माजी राज्यपाल

जेव्हा म्हणाले होते, की पाऊस यावा म्हणून जनतेनं प्रार्थना करावी, तेव्हा इतक्या मोठय़ा पदावरच्या व्यक्तीनं वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं हे त्यांचं सांविधानिक कर्तव्य आहे, हे ठणकावून सांगणाऱ्या  लीलाताई होत्या. पहिलीपासून इंग्रजी सुरू करण्याचा शासनाचा निर्णय झाला तेव्हा त्याला विरोध करणारं पत्र लीलाताईंनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना लिहिलं होते. असा विरोध केला म्हणून कदाचित शाळेची मान्यता काढून घेतली जाईल हा धोका त्यांनी शाळेच्या सभेत बोलून दाखवला होता. आपण घेतलेल्या भूमिकांमुळे आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागू शकेल, याची जाणीव ठेवून संघर्ष करण्याची लीलाताईंची तयारी असायची.

‘सृजन आनंद’मध्ये समाजातले अनेक घटक शिक्षक या नात्यानं आवर्जून यायचे.  कुंभार काम करणारे, परिचारिका, पोलीस, सुतार, अग्निशमनदलातले जवान, संशोधक असे अनेक जण आपले प्रत्यक्ष अनुभव सांगायला शिक्षक या नात्याने यायचे, तर दुसरीकडे नामवंत लोकही येत. ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर, शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्यासारखे अनेक लोक मुलांशी संवाद साधत. शाळेतली मुलंसुद्धा चार भिंतींबाहेर पडून सतत समाजातल्या विविध घटना, व्यक्ती, संस्था यांच्याकडून शिकत असायची. ‘सृजन आनंद विद्यालय’ आणि बाहेरचा समाज हे एकमेकांचे अविभाज्य भाग होते.  दुष्काळ असो, पूरपरिस्थिती असो किंवा रहदारी, प्रदूषणाचा प्रश्न असो. ‘सृजन आनंद’ची मुलं कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्या प्रश्नांची ओळख  नेहमीच करून घेत असतात. लीलाताईंच्याच शब्दांत सांगायचं तर, ही सगळी ‘प्रजासत्ताकाची मशागत’ विद्यालयात सतत चालू असते.

आनंददायी शिक्षण म्हणजे पोरखेळ आहे असं कुणी मानू नये. आनंददायी, सर्जनशील, बालककेंद्री  शिक्षण ही एक गंभीर सामाजिक, राजकीय कृती आहे आणि त्या कृतीच्या आड  येणारा जड समाज, अवघड शासन, अवजड नोकरशाही यांनाच बरोबर  घेऊन त्यांच्याच करवी हे काम करावं लागतं. त्यामुळे या कोणत्याही घटकांशी फटकून न राहता, प्रसंगी त्यांना बरोबर घेऊन, प्रसंगी धारेवर धरून आपला मुद्दा पुढं नेण्याची कसरत लीलाताई करत होत्या.  लोकशाही रुजवणं, जगवणं, तगवणं अवघड असतं. ते जाता-जाता होणारं काम नव्हे. शाळेतल्या मुलांना लोकशाही मूल्यं कशी शिकवायची? तर शाळेतल्या शिकण्या-शिकवण्याच्या प्रक्रियाच लोकशाही पद्धतीच्या बनवायच्या. म्हणजे विद्यार्थ्यांचा गणवेश  कोणता असावा, हा निर्णय विद्यार्थ्यांनीच घ्यायचा. शाळा कशी असावी, शिक्षकांकडून मुलांच्या कोणत्या अपेक्षा आहेत, हे मुलांनी मोकळेपणानं मांडायचं. पाणीप्रश्नाचा अभ्यास करायचा असेल तर सलग तीन र्वष काम करून त्या विषयाच्या अनेक बाजू समजावून घ्यायच्या. लीलाताईनी लिहिलेल्या पुस्तकांमधून अशा अनेक लोकशाहीपूरक कृतींचं सविस्तर वर्णन वाचायला मिळतं.

‘सृजन आनंद’ शाळेतल्या नोंदवह्य़ा हा एक अतिशय महत्त्वाचा शैक्षणिक दस्तावेज आहे. शाळेच्या स्थापनेपासून (१९८५) आजपर्यंत शिकण्या-शिकवण्याचे जे प्रयोग झाले, त्यांची तपशीलवार नोंद त्यात आहे. एखादा विषय अमुक पद्धतीनं का शिकवला,  त्यावर विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया काय होती, विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी आल्या, इतर कोणत्या पद्धतींनी हा मुद्दा मांडला आला असता, अशा अतिशय बारीकसारीक नोंदी या वह्य़ांमध्ये आहेत. विशेष गोष्ट म्हणजे आजपर्यंत झालेल्या प्रत्येक तासिकेला काय घडलं, याची नोंद या वह्य़ांमध्ये आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अनिल सदगोपाल म्हणाले होते, की या तोडीचं काम किमान भारतात दुसऱ्या कुणी केलेलं नाही हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. या शैक्षणिक नोंदवह्य़ा म्हणजे महाराष्ट्राचा सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आरसा आहे. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या संशोधकांसाठी या नोंदवह्य़ा ही एक मोठी संधी आहे. सामाजिक परिवर्तनाची कळकळ असणाऱ्या राज्यशास्त्र, समाजशास्त्र, शिक्षणशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी या ‘पेडॅगॉजी’कडे- अर्थात शिक्षणपद्धतीकडे गांभीर्यानं लक्ष दिलं तर मोलाचं काम होऊ शकेल. ‘सृजन आनंद विद्यालया’तल्या अनेक गोष्टी या आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणल्या जातील अशा दर्जाच्या आहेत.

लीलाताईंचा स्वभाव अतिशय आग्रही. ‘परफेक्शन’चा पराकोटीचा आग्रह. सहकाऱ्यांना वैचारिक स्पष्टता असलीच पाहिजे याचा ध्यास, विषयाच्या अनेक बाजू माहीत असल्या पाहिजेत, कल्पनाशक्ती मोकळी सोडली पाहिजे, प्रकल्प वेळेत पूर्ण झालेच पाहिजेत, नियोजन काटेकोरच पाहिजे, खर्च कमी झालाच पाहिजे, अशा नाना प्रकारच्या त्यांच्या ‘च’च्या मागण्या असायच्या. त्यामुळे लीलाताईंबरोबर काम करणं ही सोपी गोष्ट नव्हती. त्यांच्या सहकाऱ्यांपैकी कुणी जर एखादा लेख लिहीत असेल, तर तो पुन:पुन्हा लिहून, बारीकबारीक दुरुस्त्या करून लीलाताईंच्या मनासारखा उतरवायचा ही साधी गोष्ट  नव्हती. इतकं करून लीलाताई शेवटी कौतुक करतील याची शाश्वती नाही. लीलाताई या सगळ्या मागण्या  स्वत:कडूनही करायच्या आणि त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी स्वत:ही पराकाष्ठा करायच्या. काम कोणत्या दर्जाचं असावं याच्या लीलाताईंच्या स्पष्ट कल्पना असायच्या आणि ते तसं पूर्ण होईपर्यंत त्यांना चैन पडायचं नाही.

लीलाताईंनी केलेल्या कामाला ‘लीलाताईंचं काम’, ‘लीलाताईंची शाळा’, असं संबोधण्यात मोठा धोका आहे. व्यक्तिपूजेत रमणाऱ्या आपल्या समाजासाठी अजून एक विभूती त्यातून तयार होईल. लीलाताईंना स्वत:च्या अशा उदात्तीकरणात काडीचाही रस  नव्हता. आपण ज्या शैक्षणिक मूल्यांसाठी झटतोय ती मूल्यं सार्वत्रिक होऊन सामान्य मुलामुलींपर्यंत पोहोचावीत, हा त्यांचा ध्यास होता. भावनेच्या पुरात वाहून न जाता प्रत्येक गोष्टीकडे बारकाईनं बघावं, त्यातले ताणेबाणे समजावून घ्यावेत, उलटसुलट बाजू तपासाव्यात, प्रश्न उभे करावेत, आणि त्या मुद्दय़ात किती तथ्य आहे, या निकषावर पुढची उभारणी करावी, अशी वैज्ञानिक विचारपद्धती लीलाताईंच्या कामात उघडपणे दिसायची. राजीव  गांधी पंतप्रधान असताना त्यांची लीलाताईंशी भेट झाली होती आणि शिक्षणात योग्य ते बदल करण्याच्या दृष्टीनं त्यांनी काही पावलंही उचलली होती. दिल्लीहून एक शिष्टमंडळ शाळेमध्ये येऊनही गेलं होतं; पण नंतरच्या राजकीय घडामोडी आणि राजीव गांधींची निर्घृण  हत्या यामुळे तो विषय मागे पडला. लीलाताई याबद्दल हळहळ व्यक्त करायच्या.

काही लोक ‘सृजन आनंद विद्यालया’च्या परिणामकारकतेबाबत चिकित्सक शंका व्यक्त करतात. फक्त पहिली ते चौथीच्या मुलांना असं शिक्षण देऊन काय फायदा, असा मुद्दा काढतात. ‘सृजन आनंद’च्या शैक्षणिक योगदानाची निरोगी चिकित्सा होणं अगदीच आवश्यक आहे. त्याचबरोबरीनं कोल्हापूर किंवा परिसरात ‘सृजन आनंद’ला पूरक अशी दहावीपर्यंतची शाळा का सुरू झाली नाही, याचीही चिकित्सा झाली पाहिजे. शिक्षण हे एकटय़ादुकटय़ाचं काम नाही, ती एक सामाजिक कृती आहे, ही भूमिका  जर मान्य असेल तर कोल्हापूरमधल्या इतर लोकांना हे शैक्षणिक तत्त्वज्ञान आपणही पुढे न्यावं, असं का वाटलं नाही, याचीही जरूर चिकित्सा झाली पाहिजे. ‘सृजन आनंद’पासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातल्या आणि सीमाभागातल्या अनेक शाळांनी या प्रकारचं  शिक्षण दहावीच्या स्तरापर्यंत नेता येतं हे सिद्ध केलं आहे, याची जरूर नोंद घ्यायला हवी.

आवर्जून सांगावी अशी आणखी एक गोष्ट. लीलाताईंच्या उतारवयात, त्यांना स्मृतिभ्रंश झाल्यानंतर त्यांच्या जवळच्या लोकांनी ज्या पद्धतीनं लीलाताईंना आधार दिला, ती अतिशय मोलाची गोष्ट आहे. ‘सृजन आनंद विद्यालया’तले त्यांचे सहकारी आणि कोल्हापुरातले काही संवेदनशील लोक यांनी सातत्यानं लीलाताईंच्या सहवासात राहून त्यांचं खाणंपिणं, औषधोपचार याकडे अतिशय मनापासून लक्ष दिलं. त्यांना भावनिक आधार देणं, त्यांच्याशी जाऊन गप्पा मारणं, काही वाचून दाखवणं, अशा गोष्टी केल्या. या नात्याला आई, मुलगी वगैरे कोणतंही नाव न देता त्यांचा मायेनं सांभाळ केला. आपली वैचारिक वाढ ज्या व्यक्तीमुळे झाली, तिच्याविषयीची कृतज्ञता अशा कृतिशील पद्धतीनं व्यक्त करणं ही फार आगळीवेगळी गोष्ट आहे असं मला वाटतं.

कोल्हापूरच्याच ‘आंतरभारती शिक्षणसंस्थे’चासुद्धा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. लीलाताईंसारख्या प्रखर बुद्धी आणि धारदार मतं असलेल्या व्यक्तीला शैक्षणिक प्रयोगाची जागा तयार करून देण्याचं महत्त्वाचं काम या संस्थेनं केलं. आज महाराष्ट्रात या शैक्षणिक कामाचा जो प्रसार होत आहे, त्यामागे ‘आंतरभारती’नं दिलेल्या संस्थात्मक पाठबळाचा निश्चितच वाटा आहे.

लीलाताई म्हणायच्या, ‘‘होडी बंदरात सुरक्षित नांगरून ठेवण्यासाठी बांधलेली नसते. तिची जागा असते उधाणत्या समुद्रात. काही काम करायचं असेल, बदल घडवायचे असतील, तर आपली होडी खोल पाण्यात लोटली पाहिजे.’’ लीलाताईंना आदरांजली वाहणं हेसुद्धा जोखमीचं काम आहे. त्या कधीही येतील आणि म्हणतील, ‘‘काय, होडी किनाऱ्यावरून हलायला तयार नाही वाटतं? घाबरताय वाटतं? नाही, मला आपलं उगीच वाटून गेलं तसं!’’

लीलाताईंना मानणाऱ्या सगळ्यांनी आपापल्या होडय़ा जीवनाभिमुख शिक्षणाच्या समुद्रात खोलवर नेऊन उभ्या केल्या पाहिजेत. नांगर टाकायचा तर तिथंच टाकता येईल.. आणि लीलाताईंना अशी कृतिशील आदरांजली निश्चितच आवडेल.

(लेखक हे माहितीपट निर्माते असून त्यांनी ‘मूलगामी’ या माहितीपटाच्या निमित्तानं प्राचार्य लीलाताई पाटील यांच्याबरोबर जवळून काम केलं आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 12:24 am

Web Title: lila patil madam srujan anand vidyalay dd70Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)