many big challenges In front of Marathi film industry after coronavirus period zws 70 | करोनोत्तर मराठीपट

0
75
Spread the love

विनोद सातव

सध्या तरी चित्रपटसृष्टी पूर्णपणे कधी सुरू होणार याविषयी फक्त अंदाजच वर्तविले जाऊ शकतात. करोनोत्तर काळात मराठी चित्रपटसृष्टीसमोर अनेक मोठी आव्हानं उभी राहतील. त्यामुळे आपल्या सगळ्यांना काही गोष्टी काळाच्या ओघाने स्वीकाराव्या लागतील. निर्मितीखर्चात करावी लागणारी कपात आणि वाढता खर्च या दोहोंचा मेळ घालणे, नफ्यापेक्षा तोटय़ाचे गणित अधिक दिसत असल्याने एकदाच चित्रपट निर्मिती करणाऱ्या निर्मात्यांची संख्या आपसूक कमी होईल. चित्रपटाकडे व्यवसाय या नजरेने बघणारेच निर्माते टिकतील, या सगळ्याचा परिपाक म्हणजे संख्येने कमी पण उत्तम आशयघन कलाकृती मराठीत निर्माण होतील..

‘एकाच वेळेस वायुवेगाने जगभर पसरलेली महामारी, त्यात होणारे मृत्यू, भयभीत झालेले लोक, स्तब्ध झालेलं जग, कोलमडलेली अर्थव्यवस्था, उद्ध्वस्त झालेली माणसं, अंधारलेलं भविष्य..’ हे एखाद्या ‘साय-फाय’ चित्रपटाचं कथानक वाटू शकतं, पण नाही.. ही कथा नसून एका सत्य घटनेवर आधारित सध्या एक मोठा चित्रपट वास्तवात सुरू आहे आणि आपण प्रत्येक जण या चित्रपटातील एकेक पात्र झालो आहोत.

आजवर अनेक सुलतानी किंवा अस्मानी वगैरे संकटं आली आणि गेली.. परंतु ‘न भूतो न भविष्यति (?) ’ अशा या करोना नामक एका अफाट संकटानं राज्य-देश-खंड यांच्या मानसिक सीमा पुसून टाकल्या! संपूर्ण मानवजात एका बाजूला आणि करोनाचा एक अतिसूक्ष्म पण दुष्ट विषाणू दुसऱ्या बाजूला असे एक युद्ध डिसेंबर २०१९ ला सुरू झाले आणि अजूनही ते सुरूच आहे. या युद्धभूमीवर अनेक योद्धे लढत आहेत, काही धारातीर्थीही पडत आहेत. त्यासाठी आपण प्रत्येकाने सुरक्षित कवच घालून लढण्यातच खरा शहाणपणा आहे. आपल्याला या युद्धात जिंकायचे आहे. एक दिवस लस येईल आणि हे युद्ध संपेल तेव्हा आपण प्रत्येक जण एका इतिहासाचे साक्षीदार बनलेले असू आणि मग संपूर्ण जगाच्या ‘टाइमलाइन’चे दोन भाग पडतील – एक करोनापूर्व काळ आणि एक करोनोत्तर काळ!

त्यामुळे साहजिकच, भविष्यात प्रत्येक क्षेत्र या दोन काळात विभागले जाईल. तेव्हा पर्यायानं मराठी चित्रपटसृष्टीची विभागणीसुद्धा अशीच झालेली दिसेल. करोनापूर्व काळात म्हणजेच मार्च २०२० पर्यंतचा विचार केला तर असे लक्षात येते की दर शुक्रवारी किमान दोन-तीन ते पाच-सहा मराठी चित्रपट प्रदर्शित होत असत. एकेकाळी मराठीत वर्षांकाठी २५ ते ४० चित्रपटांची निर्मिती होऊन ते प्रदर्शित व्हायचे. ती संख्या अलीकडे १२० ते १२५च्या आसपास पोहोचली होती. यामुळे अनेक चित्रपटांना एकाच वेळी आलेल्या सिनेमांच्या गर्दीचा फटका बसायचा. त्यामुळे चांगले सिनेमेही या गर्दीला बळी पडले आहेत. एखादा चांगला आशय असलेला सिनेमा, पहिल्या आठवडय़ातच कमी प्रतिसादामुळे खाली उतरवला जायचा, कारण पुढच्या शुक्रवारी प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेल्या चित्रपटांची मोठी रांग असायची. चांगले थिएटर आणि चांगले शो मिळविण्यासाठी निर्मात्यांना धडपडावे लागत असे, येणाऱ्या काळात हे चित्र बदललेले असेल.

मार्च २०२० पर्यंत ज्या चित्रपटांची कामे सुरू होती, एप्रिल – मे महिन्यात प्रदर्शनाच्या तारखा निश्चित होत्या, तेच चित्रपट थिएटर सुरू झाल्यानंतर प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये महेश मांजरेकर आणि झी स्टुडिओचा ‘पांघरूण’, वायकॉम १८चा ‘वसंतराव देशपांडे’, त्याचप्रमाणे ‘बस्ता’, ‘इन्स्टिटय़ूट ऑफ पावटालॉजी’ आदी चित्रपटांचा समावेश आहे. प्रवीण तरडे यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’, दिग्पाल लांजेकरचा ‘जंगजौहर’, ‘दगडी चाळ २’, ‘दे धक्का २’, ‘मीडियम स्पाईसी’ आदी चित्रपटांचे चित्रीकरण आणि पोस्ट प्रॉडक्शनची कामे थोडीफार राहिली आहेत. असे काही मोजके सिनेमे करोनोत्तर काळात प्रदर्शित होणार आहेत. परिणामी या चित्रपटांना उत्तम व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे.  या काळातील हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेचा विचार केला तर अमिताभ बच्चन, आयुष्यमान खुराना यांचा ‘गुलाबो सिताबो’,  अक्षयकुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’, विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’ या बडय़ा चित्रपटांनी ओटीटीचा पर्याय स्वीकारला आहे. सलमान खानचा ‘राधेय’, अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’, वरुण धवनचा ‘कुली नं १’,  अजय देवगणचा ‘मैदान’, रणवीर सिंगचा ‘८३’ असे बडे चित्रपट थिएटर सुरू होण्याची वाट बघत आहेत. बॉलीवूडच्या या बडय़ा सिनेमांसोबत दक्षिणात्य आणि हॉलीवूडच्या चित्रपटांचीही यादी असेल ती वेगळीच.

प्रॉडक्शन डिझाइनमध्ये बदल करण्याची गरज

याविषयी बोलताना ‘वायकॉम १८ मराठी’चे बिझनेस हेड निखिल साने म्हणाले की, आता वेळ आली आहे दर्जा टिकवून प्रॉडक्शन डिझाइनमध्ये बदल करण्याची. मराठी चित्रपटाच्या व्यावसायिक मर्यादा लक्षात घेता ते आवश्यक आहे. हिंदी चित्रपट आज ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित होत आहेत, मात्र ओटीटीवर मराठीला मागणी नाही. अशा काही मर्यादा लक्षात घेऊन आपल्याला काम करावे लागणार आहे. उच्च निर्मिती म्हणजे उच्च गुणवत्ता असे नाही हे पुन्हा सांगायची गरज निर्माण झाली आहे. चित्रपटासाठी संहिता महत्त्वाची असते हे पुन्हा एकदा आपल्याला दाखवून द्यावे लागणार आहे. सर्व काही सुरळीत झाले तर हिंदीची लाट दिवाळीत येईल, पण मराठी चित्रपटांना जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागेल. कारण, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली-कल्याण, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि संपूर्ण पुणे जिल्हा ही बाधित क्षेत्रं झाली आहेत आणि मराठी चित्रपटाला याच शहरातून जास्त व्यवसाय मिळतो, असे साने सांगतात. परंतु या भागातील सद्य:स्थिती लक्षात घेता मराठी निर्मात्यांनी थिएटर सुरू झाल्यानंतर पहिल्या लाटेत उडी मारू नये. एकंदर परिस्थितीचा विचार करता २०२१ हे वर्ष मराठी सिनेमाला नवे वळण देणारे ठरेल.

विषयाची निवड गरजेची

प्रसिद्ध डीओपी आणि दिग्दर्शक महेश लिमये यांच्या मते सध्याची परिस्थिती लक्षात घेता प्रेक्षक पैसे खर्च करताना अनेक बाबी तपासून पाहणार आहेत. त्यांच्याकडे मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध आहेत, अशा वेळी प्रेक्षक टिकवायचा आणि वाढवायचा असेल तर फक्त चित्रपटाचा निर्मिती खर्च कमी करून चालणार नाही. जर निर्मिती खर्च कमी करून प्रेक्षकाला आपल्या सिनेमाकडे खेचायचे असेल तर सिनेमाच्या कथानकासह इतर बाबींवर अधिक लक्ष द्यावे लागेल. चित्रपटाच्या यशामध्ये कथेचा आशय, पात्रांची संख्या, संगीत, तांत्रिक बाजू आशा विविध घटकांचा सहभाग असतो, यामुळे निर्मिती खर्च कमी करण्यापेक्षा कमी खर्चात चित्रपट निर्माण होतील असे विषय निवडणे गरजेचे आहे.

सिनेमांची संख्या आणि बजेट दोन्हीवर परिणाम

इंडस्ट्री म्हणून करोनाचा तात्काळ परिणाम सिनेमांची संख्या आणि बजेट दोन्हीवर होईल, असे मत झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी यांनी व्यक्त के ले. चित्रपटांची पूर्वप्रसिद्धी आता पूर्वीपेक्षाही जास्त महत्त्वाची ठरेल. एकीकडे बजेट कपात आणि दुसरीकडे साशंक प्रेक्षक  यामुळे ब्रँड/बॅनर- यांचे मूल्य महत्त्वाचे ठरेल, त्यामुळे चित्रपटाचा विषय आणि दर्जा यांवर अजून जास्त जाणीवपूर्वक काम केलं जाईल, ज्याचा प्रेक्षकांना फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. चित्रपट निर्मिती, वितरण ते अगदी ओटीटी प्लॅटफॉर्मपर्यंत झी स्टुडिओज कार्यरत असल्यामुळे योग्य ती संधी मिळताच झी स्टुडिओजचे चित्रपट प्रदर्शित के ले जातील, असेही ते म्हणाले.

पुढील वर्षी मराठी चित्रपटांची संख्या घटेल

प्रदर्शनाअभावी रखडलेल्या मराठी चित्रपटांची संख्या जास्त आहे. चित्रपटगृहे ऑगस्ट महिन्यात सुरू होतील असा अंदाज व्यक्त के ला जातो आहे. तसे घडले तर दिवाळीपूर्वीचा काळ मराठीसह प्रादेशिक सिनेमांसाठी फायद्याचा ठरेल कारण मोठय़ा हिंदी सिनेमांचे नियोजन हे दिवाळीपासून पुढचे असते, असे मत चित्रपट वितरक अंकित चंदारमानी यांनी व्यक्त के ले. मात्र थिएटर सुरू व्हायला वेळ लागला तर हिंदीची स्पर्धा टाळण्यासाठी मराठी चित्रपटांची कसोटी लागणार आहे. असे असले तरी आज प्रदर्शनासाठी सज्ज असलेले चित्रपट वगळता नवीन सिनेमे मराठीत येण्याची शक्यता कमी आहे, यामुळे २०२१ मध्ये मराठी सिनेमांची संख्या घटलेली दिसेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

कमी बजेट आणि सुरक्षेची नवी आव्हाने

करोनोत्तर काळात मराठी चित्रपट निर्मिती खर्चावर मर्यादा येतील हे निश्चित, मात्र आपल्याकडे आरोग्य आणि सुरक्षाविषयक फारशी जागरूकता नव्हती ती आता वाढली आहे. यामुळे सेटवर आरोग्य सुविधा, स्वच्छता या गोष्टी अधिक कटाक्षाने पाळाव्या लागतील. सामाजिक अंतर पाळण्यासाठी कदाचित विविध विभागाच्या लोकांना वेगवेगळ्या वेळेला सेटवर बोलवावे लागेल, जेवणाच्या वेळा वेगवेगळ्या ठरवाव्या लागतील. संपूर्ण सेट वेळोवेळी स्वच्छ करणे आवश्यक आहे, यामुळे कदाचित शूटिंगचे काही दिवस वाढतील. कारण पूर्वी मी जर १० तास शूटिंग करत असेन तर आता ते ८ तासावर येईल. सर्व गोष्टींचा एकंदरीत विचार केला तर कमी बजेटच्या सिनेमांचे शूटिंग करणे कमालीचे जिकिरीचे ठरणार आहे. सर्वच लोकांना आपल्या निर्मिती खर्चात २० ते ३० टक्के कपात करावी लागणार असल्याचे कार्यकारी निर्माते निशिथ दधीच म्हणाले.

गेली काही वर्षे चित्रपट निर्मितीचा फु गलेला आकडा आणि त्यामुळे प्रदर्शनात येणाऱ्या अडचणींमुळे मराठी चित्रपटांचे नुकसान होत होते. त्याला या बदलत्या गणितांमुळे आळा बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या या ‘साय-फाय’ चित्रपटाचा क्लायमॅक्स सकारात्मकच होईल! पण या क्लायमॅक्सच्या आधी अँटी-क्लायमॅक्सची अजून किती रिळं बाकी आहेत हे अजून गुलदस्त्यातच आहे, कारण पिक्चर अभी बाकी है!’

(लेखक माध्यम सल्लागार आहेत)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 4:36 am

Web Title: many big challenges in front of marathi film industry after coronavirus period zws 70Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)