MP shocker COVID 19 patient dies while being shifted to another hospital ambulance staff dumps body on road | धक्कादायक ! रुग्णालयात नेताना करोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू, मृतदेह रस्त्यावर ठेवून अँब्युलन्स माघारी

0
19
Spread the love

मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवताना मृत्यूमुखी पावलेल्या करोनाग्रस्त रुग्णाला रस्त्यात सोडून अँब्युलन्सचे कर्मचारी माघारी गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडला असून सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. मृत पावलेला रुग्ण हा वीज पुरवठा कंपनीत कामाला होता. या रुग्णाला आधीच किडनीचा आजार होता. २३ जून पासून भोपाळ शहरातील People’s Hospital मध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान या रुग्णाला श्वसनाचा त्रास व्हायला लागल्यामुळे त्याची करोना चाचणी करण्यात आली, ज्या चाचणीचा अहवाल पॉजिटीव्ह आला.

करोनाचा अहवाल पॉजिटीव्ह आल्यानंतर शहरात करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार होत असलेल्या चिरायु हॉस्पिटलमध्ये या रुग्णाला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. चिरायु हॉस्पिटलची एक अँब्युलन्स या रुग्णाला घेऊन जाण्यासाठी People’s Hospital मध्ये आली. हॉस्पिटलमध्ये जात असताना या रुग्णाचा वाटेत मृत्यू झाल्यानंतर चिरायु हॉस्पिटलच्या अँब्युलन्स कर्मचाऱ्यांनी परत People’s Hospital च्या दिशेने जात, हॉस्पिटलबाहेरील रस्त्यावर मृतदेह ठेवत माघारी परतणं पसंत केलं. मृत व्यक्तीच्या मुलाने याप्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करत दोन्ही हॉस्पिटलचं प्रशासन यात दोषी असल्याचा आरोप NDTV शी बोलताना केलाय.

People’s Hospital चे व्यवस्थापक उदय दीक्षित यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हॉस्पिटल प्रशासनाची बाजू मांडली. “चिरायु हॉस्पिटलची अँब्युलन्स रुग्णाला घेऊन गेल्यानंतर सुमारे ४० मिनीटांमध्येच परत आली. ज्यावेळी अँब्युलन्स परत आली, त्यावेळी सरकारी नियमानुसार आयसीयू सिल करण्यात आला होता आणि कर्मचारी निर्जंतुकीकरणाचं काम करत होते. अँब्युलन्सच्या कर्मचाऱ्यांनी स्ट्रेचरची मागणी केली, पण त्यांना ते मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी रुग्णाला हॉस्पिटलजवळील रस्त्यावर सोडून माघारी जाणं पसंत केलं. यानंतर काही वेळाने त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचं आमच्या कर्मचाऱ्यांना समजलं.”

चिरायु हॉस्पिटलच्या प्रशासनाने यावर आपली बाजू मांडली. “रुग्णाला आणण्यासाठी गेलेली अँब्युलन्स ही सुसज्ज होती. पण रस्त्यातच या रुग्णाची तब्येत बिघडली. ट्रॅफिकमुळे हॉस्पिटलला पोहचायला उशीर व्हायला नको म्हणून अँब्युलन्स कर्मचाऱ्यांनी People’s Hospital मध्ये डॉक्टरांशी बोलून परत माघारी जाणं पसंत केलं.” दरम्यान भोपाळचे जिल्हाधिकारी अविनाश लवानिया यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून People’s Hospital च्या प्रशासनाला करोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह रस्त्यावर पडून राहण्याबाबत अहवाल मागवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 3:08 pm

Web Title: mp shocker covid 19 patient dies while being shifted to another hospital ambulance staff dumps body on road psd 91


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)