mumbai news News : कुलूप कायम! ठाणे, मिरा-भाईंदर, पुण्यात लॉकडाऊन मुदत वाढली – corona lockdown : thane, kalyan, dombivali, mira bhayander, pune, pimpri chinchwad

0
56
Spread the love

म. टा. प्रतिनिधी, ठाणे / पुणे

करोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने ठाणे, कल्याण डोंबिवली तसेच मिरा-भाइंदर या महापालिकांच्या हद्दीत लावण्यात आलेल्या लॉकडाउनची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच पुणे जिल्ह्यातील अन्य काही ठिकाणीही या लॉकडाउनच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत १९ जुलैपर्यंत, मिरा-भाईंदरमध्ये १८ जुलैपर्यंत, तर पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये २३ जुलैपर्यंत कुलूप कायम राहणार आहे.

ठाणे, कल्याण डोंबिवलीत लॉकडाउनवाढ

ठाणे महापालिका हद्दीत १२ जुलैपर्यंत घोषित करण्यात आलेला लॉकडाउन १९ जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शुक्रवारी घेतला. यापूर्वीच्या आदेशानुसार घालण्यात आलेले निर्बंध शहरामध्ये कायम राहणार आहेत. मात्र नव्या आदेशानुसार घरकाम करणाऱ्या व्यक्तींना मात्र कामावर जाण्याची मुभा देण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक कामांसाठीच नागरिकांना घराबाहेर पडता येणार आहे. शहरामध्ये अत्यावश्यक कामांसाठी फिरण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून ई-पास देण्यात येत आहेत.

ठाणे शहरामध्ये जून महिन्यात लॉकडाउन शिथील झाल्यानंतर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली. ३१ मे पर्यंत तीन हजारांच्या आसपास असलेली रुग्णसंख्या ३१ जूनपर्यंत आठ हजार ७७१पर्यंत वाढली. त्यामुळे २ जुलैपासून ठाणे महापालिकेने शहरात पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाउन घोषित केला. परंतु या लॉकडाउनमध्येही रुग्णवाढीचा वेग कायम असून १० जुलैपर्यंत ठाण्यातील रुग्णसंख्या १२ हजार ५२ पर्यंत गेली. त्यामुळे लॉकडाउन वाढवण्याशिवाय अन्य पर्याय प्रशासनासमोर शिल्लक राहिलेला नाही. शुक्रवारी महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार आठ दिवसांनी लॉकडाउन वाढवण्यात आला. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी लॉकडाउनच्या मुदतवाढीचे आदेश शुक्रवारी जाहीर केले. ठाणे पोलिसांनी यापूर्वीच ३१ जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक वाहतूक बंद असून खासगी वाहनांमध्येही सुरक्षित वावराच्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दुसरीकडे, कल्याण डोंबिवली शहरातही २ जुलैपासून सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये आणखी आठ दिवसाची वाढ करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला. आता १९ जुलैपर्यंत शहर बंद राहणार असून सर्व निर्बंध कायम राहणार आहेत. कल्याण डोंबिवलीतही जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांप्रमाणे पालिका आयुक्तांनी २ जुलैपासून लॉकडाउन जाहीर केला होता. १२ जुलैच्या सकाळपर्यंत करण्यात आलेल्या या लॉकडाउनमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात यश आले असले, तरी वाढता प्रसार पाहता लॉकडाउन आणखी आठ दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून रविवार, १९ जुलैच्या संध्याकाळपर्यंत शहरात लॉकडाउन कायम राहणार असल्याचे आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

ठाणे जिल्ह्यात एकूण रुग्ण ५० हजार पार

लॉकडाउनबरोबरच इतर विविध उपाययोजना करण्यात येत असूनही जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी अधिकच वाढू लागली आहे. शुक्रवारी नवीन २ हजार ६४ रुग्ण वाढल्याने रुग्णांच्या संख्येने ५० हजाराचा टप्पा ओलांडला असून ५३ रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतांचा आकडा दीड हजाराच्या पुढे गेला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये दिवसभरात ६०६ इतक्या उच्चांकी रुग्णांची नोंद झाली असून, दुसरीकडे ठाण्यात ४१६ आणि नवी मुंबईमध्ये ३६१ नवे रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यातील रुग्णवाढीचा वेग चिंताजनक असला तरी आत्तापर्यंत एकूण ५० हजार ९२० रुग्णांपैकी २८ हजार ६१९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २० हजार ७९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परंतु जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या दोन शहरांत आजपर्यंत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. ठाण्यातील रुग्णांचा आत्तापर्यंतचा एकूण आकडा १२ हजार ४६९ इतका झाला आहे. ४८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कल्याण-डोंबिवलीमधील रुग्णांचा आकडा ११ हजार ५३७ असून शुक्रवारी यामध्ये तब्बल ६०० पेक्षाही अधिक रुग्ण वाढले. तर, आत्तापर्यंत १७२ रुग्ण दगावले आहेत. नवी मुंबईतील रुग्णांची एकूण संख्या ८ हजार ८७९ असून मृतांचा आकडा २८४ आहे. मिरा-भाईंदरमधील रुग्णांच्या संख्येने पाच हजाराचा टप्पा ओलांडला असून १७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगरमध्ये ३ हजार ६१९ रुग्णांची आत्तापर्यंत नोंद झाली असून ६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भिवंडीतील रुग्णांची संख्या २ हजार ६४० (मृत्यू १४१), अंबरनाथ २४७५ (मृत्यू ९०), बदलापूर १२७६ (मृत्यू २०) आणि ठाणे ग्रामीणमधील रुग्णांची संख्या २८१९ (मृत्यू ७८) इतकी झाली आहे.

मिरा-भाइईंदरमध्येही मुदत वाढवली

मिरा-भाईंदर शहरात करोनाबधितांची संख्या वाढत असल्याने १० जुलैपर्यंत लॉकडाउन लागू करण्यात आला होता. आता हा लॉकडाउन १८ जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय शुक्रवारी महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी घेतला आहे.

पुणे, पिंपरी चिंचवडमध्येही निर्बंध कायम

‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाली असताना आणि शहरातील व्यवहार पूर्ववत होत असताना पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी मध्यरात्रीपासून पुन्हा दहा दिवसांचा कडक ‘लॉकडाउन’ जाहीर करण्यात आला आहे. करोनाचा फैलाव वाढत असल्याचे सांगून, प्रशासनाकडून ही घोषणा करण्यात आली; तसेच शहरालगत आणि ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्रात निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. दरम्यान, उद्योग क्षेत्र आणि व्यापारी वर्गातून या निर्णयास विरोध करण्यात आला असून, ‘लॉकडाउन’ची घोषणा होताच भाजीपाल्यापासून ते मद्याच्या दुकानांपर्यंत सर्वत्र खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र शुक्रवारी दिसले.

‘लॉकडाउन’चे दोन टप्पे करण्यात आले असून, १४ ते १८ जुलै या कालावधीत कडक लॉकडाउन असणार आहे. या कालावधीत औषधे, दूध, रुग्णालये आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. १९ ते २३ जुलै या कालावधीत सकाळी दहा ते दुपारी चार या कालावधीत थोडी शिथिलता आणली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी येत्या दोन दिवसांत अत्यावश्यक वस्तूंचा साठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्या वेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्याचे आदेश दिले. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत लॉकडाउनची घोषणा केली.

पुण्यातील २३ ग्रामपंचायतींचा परिसर लॉकडाउन

जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील १८ ग्रामपंचायती आणि मुळशी तालुक्यातील पाच ग्रामपंचायती अशा २३ ग्रामपंचायतींचा परिसर’लॉकडाउन’ केला जाणार आहे. हवेलीतील वाघोली, केसनंद, आव्हाळवाडी, मांजरी खुर्द, लोणी काळभोर, उरुळी कांचन, कुंजीरवाडी, औताडे, हांडेवाडी, वडकी, नांदेड, किरकिटवाडी, खडकवासला, डोणजे आणि खानापूर आदींचा समावेश आहे. मुळशीतील नांदे, भूगाव, भुकूम, पिरंगुट आणि घोटावडे या ग्रामपंचायतींच्या हद्दीत लॉकडाउन असणार आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)