Parner Corporators against Vijay Auti: Parner: नगरसेवकांच्या घरवापसीचा शिवसेनेचा आनंद ठरला क्षणिक; आता नवा पेच – ahmednagar: corporators who returned to shivsena demands action against former party mla vijay auti

0
24
Spread the love

म.टा. प्रतिनिधी । नगर

महाविकास आघाडीच्या भूमिकेमुळे पुन्हा शिवसेनेत परण्याची वेळ आलेल्या पारनेर नगर पंचायतीच्या नगरसेवकांनी आता शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांना थेट टार्गेट केले आहे. आमचा राग शिवसेनेवर नाही, तर औटी यांच्यावर असल्याचे सांगत औटी शिवसैनिक नव्हे तर कम्युनिस्ट विचारांचे आहेत, असा आरोप केला आहे. पक्षाच्या हितासाठी औटी यांची शिवसेनेतून हक्कालपट्टी करावी, अशी मागणीच या नगरसेवकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. यामुळे आता शिवसेनेच्या नेतृत्वापुढे नवा पेच निर्माण झाला आहे.

वाचा: करोना थांबेना! पुणे जिल्ह्यासाठी अजित पवारांचा धाडसी निर्णय

आघाडी धर्म पाळण्यासाठी या नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत पाठवत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. त्यामुळे त्यांच्यावर झालेली फोडाफोडीची टीका थांबली. मात्र, शिवसेनेत परत आलेल्या या नगरसेवकांनी आता औटी यांनाच पक्षविरोधी ठरवत त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख उषा बोरूडे यांच्यासह नगरसेवक डॉ. मुद्दिसर सय्यद, नंदकुमार देसमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी व नंदा देशमाने यांनी हे निवेदन पाठविले आहे. यापूर्वी या नगरसेवकांनी औटी यांच्यावर मनमानी केल्याचे आरोप केले होते. मात्र, आता त्यांच्या विचारसरणीचाच प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांना कम्युनिस्ट आणि काँग्रेस धार्जिने ठरविण्याचा प्रयत्न केला आहे.

वाचा: ‘एक शरद, बाकी गारद’ हा शब्दप्रयोग नेमका आला कुठून?

यासंबंधी निवेदनात म्हटले आहे की, ‘पारनेर तालुक्याचे कम्युनिस्ट पक्षाचे पहिले आमदार भास्करराव औटी यांचे विजय औटी चिरंजीव आहेत. त्यामुळे यांची विचारसरणी आजही कम्युनिस्ट आहे. १९८५ मध्ये औटी यांनी समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढविली होती. त्यात ते पराभूत झाले होते. त्यानंतर काँग्रेसच्या माध्यमातून राजकारण करताना त्यांनी नेहमीच शिवसैनिकांना शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या. काँग्रेसकडून विधानसभेची उमेदवारी मिळत नसल्याने स्वार्थासाठी त्यांनी २००४ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. शिवसैनिकांच्या जीवावर ते विजयी झाले. मात्र, शिवसैनिकांची सतत हेटाळणी करीत राहिले. आमदार झाल्यापासून त्यांनी तालुक्यात शिवसेनेची एकही शाखा उघडली नाही. तेव्हा तालुका प्रमुख असलेल्या नीलेश लंके यांनी शाखा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यावर औटी यांनी त्यांना अपमानित केले. इतर पक्ष कसे जिवंत राहतील, हे त्यांनी पाहिले. जिल्हा नियोजन मंडळाच्या निवडणुकीत पुरेसे संख्याबळ नसतानाही लंके यांच्या पत्नी राणी लंके सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या, परंतु तेथेही औटी यांनी कम्युनिस्ट सदस्य उज्ज्वला ठुबे यांना पुढे करण्याचे पाप केले. जिल्हा परिषद निवडणुकीतही शिवसेनेच्या उमेदवार राणी लंके यांना पराभूत करण्यासाठी औटी यांनी विरोधकांशी संधान साधले होते.’

वाचा: ‘शरद पवार तेव्हा संसदेतील मोदींच्या चेम्बरमध्ये का गेले होते?’

‘औटी हे शिवसैनिक नाहीत, ते कम्युनिस्ट’

शिवसेनेच्या द़ृष्टीने भावनिक आणि महत्वाचे मुद्दे उपस्थित करूनही या नगरसेवकांनी औटी यांना उघड पाडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासंबंधी निवेदनात म्हटले आहे की, ‘शिवसैनिकांचे श्रद्धास्थान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त औटी यांनी कधीही उपक्रम घेतले नाहीत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर अभिनंदनाचे फलक लावले नाहीत. पक्षाच्या मुखपत्राला जाहिरातींची मदत केली नाही. शिवसेना प्रमुखांच्या अस्थी तालुक्यात आल्या असता औटी दर्शनालाही आले नाहीत. अस्थींची मिरवणूक काढून सत्ता मिळत नसते अशी दर्पोक्ती करून शिवसैनिकांना अपमानित केले. औटी यांच्या वाढिवसानिमित्त उद्धव ठाकरे पारनेरला आले होते. तेव्हा औटी यांनीच त्यांच्या ताफ्यावर दगडफेक घडवून आणली आणि लंके यांच्या समर्थंकांनी केल्याचे भासवून लंके यांची पक्षातून हकालपट्टी केली. पंधरा वर्षे शिवसेनेकडून पद उपभोगल्यानंतरही ते पक्षविरोधी भूमिका घेत असतात. विधानसभा निवडणुकीत त्यांचा साठ हजार मतांनी पराभव झालेला आहे. त्यामुळे ते यापुढे राजकारणात टिकण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे त्यांची पक्षातून हक्कालपट्टी करून निष्ठावान शिवसैनिकाकडे पक्षाची धुरा सोपवावी. अन्यथा तालुक्यात एकही शिवसैनिक शिल्लक राहणार नाही.’

हे निवेदन त्या नगरसेवकांच्या नावे दिले असले तरी सध्या ते लंके यांच्यासोबत आहेत. त्यामुळे औटींविरुद्ध लंकेच्या मोहिमेचा हा पुढचा टप्पा मानला जात आहे. ज्या पद्धतीने आपल्याला शिवसेनेतून जावे लागले, तशीच अवस्था औटी यांची करण्याची त्यांची योजना दिसते. मात्र, यात आता शिवसेनेची कोंडी झाली आहे. राष्ट्रवादीत गेलेले नगरसेवक परत आणल्याचा आनंद क्षणिक टिकला. आता औटी यांच्या विरुद्ध कारवाई केली तर या नगरसवेकांचे पर्यायाने राष्ट्रवादीचे ऐकले असे होईल. तर दुसरीकडे औटी यांच्याबद्दल एवढी माहिती जाहीर होऊनही खपवून कसे घेतले, असा संदेश जाण्याची भीती आहे, अशी कोंडी शिवसेनेची झाली आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)