police recruitment in maharashtra: राज्यात मेगा पोलिसभरती, उपमुख्यमंत्र्यांची माहिती – mega police recruitment in the state

0
28
Spread the love

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि पोलिस दलावरील ताण कमी करण्यासाठी १० हजार पोलिस शिपाई संवर्गातील जागा भरण्यात येणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिली. ही भरतीप्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. याशिवाय नागपूरमधील काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

– पोलिस दलावरील ताण कमी करण्यासाठी

– भरतीप्रक्रिया वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश

– शहरी व ग्रामीण तरुणांना भरतीचा फायदा

राज्यातील पोलिस शिपाई भरतीचा फायदा शहरी व ग्रामीण तरुणांना होईल. त्यांना पोलिस दलात सेवेची संधी मिळेल, असे उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केले. त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यानंतर त्यांनी वरील माहिती दिली. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. श्रीनिवास, एसआरपीएफच्या अप्पर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत गृह विभागाकडून पोलिस शिपाईपदाच्या आठ हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यात आणखी दोन हजार जागा वाढवून एकूण १० हजार पोलिस शिपाई भरती करण्याचे निर्देश दिले. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ही भरतीप्रक्रिया विनाअडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल याचा विचार करून सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने मांडण्याचे निर्देशही त्यांनी दिले. राज्य मंत्रिमंडळात या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर भरती प्रक्रियेची कार्यवाही वेग घेईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

नागपुरात महिला बटालियन

नागपूरच्या काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाची महिला बटालियन स्थापन करण्याच्या निर्णयावरही उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शिक्कामोर्तब झाले. या बटालियनसाठी एक हजार ३८४ पदे निर्माण करण्यात येणार आहेत. प्रत्येक टप्प्यात ४६१ प्रमाणे तीन टप्प्यांत ही पदे भरण्यात येणार आहेत. राज्यातील सण, उत्सव, सामाजिक-राजकीय मोर्चांमध्ये महिलांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन कायदा सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही बटालियन स्थापन करण्यात येणार आहे.

उपराजधानी नागपूरची भौगोलिक स्थिती, रेल्वे, विमान व दळणवळणाच्या साधनांची उपलब्धता लक्षात घेवून एसआरपीएफच्या या केंद्रासाठी नागपूर जिल्ह्याची शिफारस करण्यात आली होती. त्याअनुषंगाने काटोल गावच्या हद्दीत शासकीय जमीन उपलब्ध असल्याने त्याठिकाणी ही बटालियन स्थापन करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील युवक, युवतींना पोलिस सेवेत दाखल होण्याची संधी मिळेलच, त्याचबरोबर पोलिसांवरील ताण कमी होण्यास, कायदा-सुव्यवस्था अधिक भक्कम होण्यास मदत होईल असे अजित पवार यांचे म्हणणे आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)