Politics in Parner: NCP: राष्ट्रवादीचे नागमोडी राजकारण सुरू; पारनेरमध्ये शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडले! – ahmednagar: five shivsena corporators joins ncp in the presence of deputy cm ajit pawar

0
24
Spread the love

अहमदनगर: राज्यात शिवसेनेसोबत सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी कुरकुर सुरूच आहे. राज्यात सत्ता येण्यापूर्वीच पारनेरला शिवसेना व राष्ट्रवादीचे जुगाड जमवून नगरपंचायतीत सत्ता आली होती. आता पुढील निवडणुकीच्या तोंडावर बेबनाव झाला असून शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले आहेत. त्यामुळे पारनेर शहरात राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांचे वर्चस्व वाढले असून शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांना मोठा धक्का मानला जात आहे. (Shivsena Corporators joins NCP)

वाचा: देवेंद्र फडणवीस यांनी हे कायम लक्षात ठेवावं – नारायण राणे

पारनेरच्या शिवसेनेतील पाच नगरसेवकांनी आज दुपारी बारामतीला जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदार लंके यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. याशिवाय शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला.

नगराध्यक्षांविरुद्धचा रोष असे प्रथमदर्शनी कारण सांगितले जात आहे. मात्र, येत्या काही महिन्यांत नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. त्यासाठी आमदार लंके यांनी सुरू केलेली ही तयारी असल्याचे सांगण्यात येते. तालुक्याचे आमदार असले तरी शहरावरही वर्चस्व असले पाहिजे, हाच त्यांचा हेतू आहे. अशाच पद्धतीने जामखेडमध्येही तेथील नगरपालिकेची सत्ता ताब्यात घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना काही दिवसांपूर्वीच यश आले आहे. फरक एवढाच की जामखेडला भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. तर पारनेरला राज्यातील सत्तेत एकत्र नांदणाऱ्या शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादीत आले आहेत.

वाचा: ‘मुख्यमंत्री गाडीतून फिरतात, अक्षय कुमारला हेलिकॉप्टर कसं मिळतं?’

पारनेरमध्ये नगराध्यक्ष पदावरून गेले काही दिवस नगरसेवक व माजी आमदार विजय औटी यांच्यात तणाव निर्माण झाला होता. औटी आमदार असताना तेथील नगरपंचायत त्यांच्या ताब्यात आली होती. त्यावेळी लंकेही शिवसेनेत होते. नंतर औटी व लंके यांच्यात अंतर पडत गेले. शेवटी लंके यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत औटी यांचाच पराभव करून ते निवडून आले. तालुक्यात त्यांचे वर्चस्व वाढत असताना शहरातही वर्चस्व आवश्यक होते. तसा त्यांचा प्रयत्न सुरूच होता. शिवसेनेत कुरुबुरी वाढल्या. त्यातच अलीकडे औटी यांनी या राजकारणात फारसे लक्ष घालणे बंद केले आहे. त्यामुळे तणाव वाढत जाऊन शेवटी हे पाच नगरसेवक आणि काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. नगरपंचायतीत १७ नगरसेवक आहेत. अपक्ष निवडून आलेल्या वर्षा नगरे यांना नगराध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते. त्यावेळीही बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या. आता नगरपंचायतीत शिवसेनेची चांगलीच हाराकीरी झाली असून त्यांचे केवळ दोन नगरसेवक उरले आहेत.

राष्ट्रवादीची मान्यता

आमदार लंके हे अजित पवार यांचे विश्वासू मानले जातात. त्यांना उमेदवारी देण्यापासून निवडून आणण्यात त्यांची मोठी भूमिका होती. खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार हेही लंके यांच्या कामावर समाधानी असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच राज्यातील सत्तेत वाटेकरी असलेल्या शिवसेनेतील फोडाफोडी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने मान्य केल्याचे सांगण्यात येते. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर औटी पक्षाकडूनही दुर्लक्षितच राहिले आहेत. त्यामुळे पारनेरमधील या फोडाफोडीची शिवसेनेकडून दखल घेतली जाऊन राज्याच्या राजकारणावर काही परिणाम होण्याचीही शक्यता नसल्याचे सांगण्यात येते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच लंके यांनी ही संधी साधली आणि पुढील निवडणुकीत पारनेर शहरातील एकहाती वर्चस्वचा मार्ग मोकळा केल्याचे मानले जाते.

वाचा: राष्ट्रवादीला धक्का; पिंपरी-चिंचवडमधील नगरसेवकाचे करोनाने निधन

राज्यात तीन पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केल्यानंतर खालच्या पातळीपर्यंत हे सर्व मनाने एक होतील का, असा प्रश्न सुरवातीपासूनच विचारण्यात येत होता. त्याचे उत्तर आता अनेक ठिकाणांहून मिळू लागले आहे. राज्यस्तरावरील कुरकुरींपेक्षा स्थानिक पातळीवरील कुरबुरी मोठ्या आहेत. त्यामुळे स्थानिक निवडणुका जशा जवळ येतील तसा सत्ता संघर्ष उफाळून येऊन महाविकास आघाडीतील घटक पक्षच स्थानिक पातळीवर एकमेकांसमोर उभे ठाकण्याचे व फोडाफोडीचे राजकारण होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. राज्यातील सत्तेत सहभागी पक्षांना स्थानिक पातळीवरही आपले अस्तित्व टिकविणे आवश्यक असल्याने याकडे दुर्लक्षाची भूमिका घ्यावी लागणार आहे.

वाचा: सासरच्यांना इतके पैसे देऊनही छळ थांबेना, शेवटी तिनं…

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)