Rapid increasing corona patients in Dadar area zws 70 | दादर परिसरात झपाटय़ाने रुग्णवाढ

0
70
Spread the love

९७ इमारतींमध्ये कठोर टाळेबंदी

मुंबई : टाळेबंदीचे नियम शिथिल केल्यानंतर सुरू झालेल्या बाजारपेठा, रस्त्यांवरील वाढलेली वर्दळ आदी विविध कारणांमुळे दादरमधील करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. धारावीमधील परिस्थिती नियंत्रणात येत असताना दादरमधील वाढणारी रुग्णसंख्या पालिकेसाठी डोकेदुखी बनली आहे. रुग्ण सापडल्याने दादरमधील सुमारे ९७ इमारतींपैकी काही अंशत:, तर काही पूर्णत: टाळेबंद कराव्या लागल्या आहेत.

मुंबईमधील मध्यवर्ती बाजारपेठ अशी दादरची ओळख आहे. केवळ उत्सव काळातच नव्हे तर इतर वेळीही दादरच्या विविध बाजारपेठा गर्दीने फुललेल्या असतात. करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर टाळेबंदी जाहीर करण्यात आली. मात्र भाजी खरेदी करण्याच्या निमित्ताने दादरमधील सेनापती बापट मार्गावरील बाजारात भल्या पहाटेपासून गर्दी होत होती. यामुळे करोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेऊन हा भाजीबाजार सोमय्या मैदान आणि वांद्रे-कुर्ला संकुलात तात्पुरत्या स्वरूपात हलविण्यात आला होता.

मुंबईमध्ये टाळेबंदी काही अंशी शिथिल झाल्यानंतर दादरमधील दुकाने सम-विषम पद्धतीने उघडण्यास सुरुवात झाली. तसेच गेल्या आठवडय़ात सेनापती बापट मार्गावरील भाजीबाजारही सुरू झाला. या बाजारात दररोज दोनशेहून अधिक वाहने ये-जा करतात. विक्रीस येणारे शेतकरी आणि खरेदीसाठी येणारे किरकोळ विक्रेते यांच्या गर्दीमुळे हा भाजीबाजार धोकादायक ठरत आहे.

त्यातच आता दादर रेल्वे स्थानकाजवळील (पश्चिम) फुलबाजारही सुरू झाला आहे. टाळेबंदी काही अंशी शिथिल झाल्यानंतर दादरकर मोठय़ा संख्येने शिवाजी पार्क येथे सकाळी आणि संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी जाऊ लागले आहेत. रस्त्यावर वर्दळ वाढल्याने एप्रिल, मेच्या तुलनेत जूनमध्ये दादरमधील रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

जून महिन्यांत रुग्णसंख्येत वाढ

मार्चमध्ये मुंबईत करोनाचा संसर्ग वाढू लागला. एप्रिलअखेरीस दादरमध्ये अवघे ३३ करोनाचे रुग्ण होते. मेअखेरीस दादरमधील करोनाबाधितांची संख्या ३१९ वर पोहोचली होती. मात्र ५ जुलैपर्यंत येथील रुग्णसंख्या ९५६ वर पोहोचली आहे. करोनाबाधित रुग्ण सापडल्याने २३ मे रोजी दादरमधील २५ इमारतींपैकी काही अंशत:, तर काही पूर्णत: टाळेबंद करण्यात आल्या होत्या. आजघडीला दादरमधील टाळेबंद इमारतींची संख्या ९७ वर पोहोचली आहे. धारावीमधील परिस्थिती नियंत्रणात येत असतानाच दादरमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने पालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभागाची झोप उडाली आहे.

करोनाबाधित रुग्ण सापडल्याने ९७ इमारती टाळेबंद कराव्या लागल्या आहेत. या इमारतींमधील पदाधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांची वेळोवेळी तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांच्या चाचण्या करण्यात येत असून रुग्णांवर वेळीच उपचार केले जात आहेत.

– किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, ‘जी-उत्तर’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 2:51 am

Web Title: rapid increasing corona patients in dadar area zws 70Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)